Ramesh Pardeshi BJP : राज्याच्या स्थानिक राजकारणात आगामी निवडणुकांचे वारे वाहत असतानाच पक्षांतराच्या मुद्द्याने जोर धरला आहे. यातच आता मनसेचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामधील अभिनेते पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यात मनसेला मोठा झटका बसला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. रमेश परदेशी यांच्यासोबतच मनसेच्या चित्रपट सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुण्यात मनसेच्या संघटनेला खिंडार पडले आहे.
पक्षांतरामागील विचारधारा आणि कारण रमेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी आपली विचारधारा आणि निर्णयामागील कारण सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष श्री. रमेश परदेशी यांनी आज प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 18, 2025
‘राष्ट्र प्रथम्’ या विचारांशी एकनिष्ठ असणाऱ्या… pic.twitter.com/stAyEkTQZT
“मी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी 22 वर्षे काम केले. पण माझ्यावर संघाचे जे संस्कार आहेत आणि ‘राष्ट्र प्रथम’ हे जे तत्त्व आहे, त्या विचारांवर ठाम राहण्यासाठी मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.”, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी मनसे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय केवळ वैयक्तिक संस्कार आणि तत्त्वज्ञानावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, ते राज्य सरकारच्या मदतीने मराठी कलाकार आणि मराठी चित्रपटांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतील, असे त्यांनी जाहीर केले.
रमेश परदेशी यांची ओळख
अभिनेते रमेश परदेशी यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारल्या. मात्र, त्यांना खरी प्रसिद्धी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामुळे मिळाली. त्यांनी यापूर्वी ‘रेगे’, ‘देऊळबंद’, ‘फत्तेशिकस्त’, आणि अजय देवगण यांचा ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.
हे देखील वाचा – Pune News : शेकोटी पेटवण्यास पुणे महापालिकेकडून बंदी! थंडीत उब घेणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा









