Eknath Shinde- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपाने चालवलेल्या फोडाफोडीमुळे नाराज झालेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार घातला होता. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या पोलीस दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे शिंदेंची नाराजी कायम असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच आज दुपारी ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये 50 मिनिटे चर्चा झाली. तर शिंदे दिल्लीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यामुळे महायुतीत तणाव पुन्हा वाढला आहे का, अशी चर्चा सुरू झाली.
मुंबईतील आझाद मैदानात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गृह खात्यांतर्गत नव्या फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही शिंदे उपस्थित नव्हते. दुपारी ते अचानक दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. दिल्लीत संध्याकाळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटले. ते उद्या नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीत कुरबूर वाढली की, शिंदे दिल्लीला जाऊन आपली खदखद व्यक्त करतात, असे अनेकदा घडले आहे. त्यामुळेच यावेळीही ते याच कारणाने दिल्लीत गेले असावेत, असे म्हटले जात आहे. काल नेत्यांच्या फोडाफोडीच्या मुद्यावरून भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील मतभेद उघड झाले होते. या फोडाफोडीचा जाब विचारणार्या शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खडसावल्याचेही सांगितले जात आहे. त्याबद्दलची आपली नाराजी शिंदेंनी अमित शहा यांच्या कानावर घातली, असे सांगितले जात आहे.
शिंदे दिल्लीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीतीलच उमेदवार परस्परांविरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे अर्ज मागे घेणे, बंडखोरी रोखणे आणि स्थानिक पातळीवरील समन्वय प्रस्थापित करण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या









