Salil Deshmukh : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी अचानक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र मोठे उधाण आले आहे. शरद पवार पक्षासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातो. मात्र सलील देशमुख यांनी यासंदर्भात अधिक स्पष्टता दिली आहे. ते म्हणत की, हा राजीनामा कोणत्याही राजकीय मतभेदातून नसून केवळ प्रकृतीच्या कारणास्तव देण्यात आला आहे.
सलील देशमुख पुढे सांगतात की, गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रकृती ठीक नसल्याने कामावर लक्ष केंद्रित करणे मला आता कठीण झाले आहे. काही काळ विश्रांती घेण्यासाठी मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पूर्णपणे बरे झाल्यावर पुन्हा कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी आणि राजकारणात नव्या जोमाने मी परत येईन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पक्ष संघटनेत देखील त्यांच्याकडे कोणतेही महत्वाचे पद नव्हते. तरीही, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक देखील लढवली होती. अनिल देशमुख यांनी स्वत: मुलाच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली असून, या अटीतटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता.
पण त्यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ऐन निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आत व्यक्तीत केली जात आहे. त्यामुळे पक्षाकडून सलील देशमुख यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जातात का? तसेच त्यांना पक्षात काही महत्त्वाची जबाबदारी देवून त्यांचं पक्षात पुन्हा कमबॅक केलं जाणार का हे पाहन आता महत्वाचं ठरणार आहे.









