LCA Tejas Crash : दुबई एअर शोमध्ये भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमान (Tejas Fighter Jet Crash) कोसळले. LCA तेजस (Tejas) या लढाऊ विमानाचे प्रात्यक्षिक करताना अपघातात शहीद झालेले विंग कमांडर नमांश स्याल हे भारतीय हवाई दलाचे (IAF) एक अत्यंत शूर आणि कुशल वैमानिक होते.
37 वर्षांच्या स्याल यांच्यावरच एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे स्वदेशी लढाऊ विमान जगाला दाखवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती.
विंग कमांडर नमांश स्याल यांच्याबद्दल
नमांश स्याल हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बगवान तहसीलमधील पतियालकाढ येथील रहिवासी होते. ते जगन्नाथ स्याल यांचे सुपुत्र होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय हवाई दलातील अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या आणि त्यांना LCA तेजस सारखे भारताचे अभिमानास्पद विमान चालवण्याचा अनुभव होता.
शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेने जागतिक विमानचालन प्रदर्शनाचे (Global Aviation Showcase) रूपांतर शोकसभेत केले. भारतीय हवाई दलाने विंग कमांडर स्याल यांच्या निधनाची बातमी निश्चित केली आणि त्यांच्या शोकाकुल कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.
HAL ची प्रतिक्रिया
तेजस विमानाचीनिर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या संस्थेनेही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. 8 मिनिटांचे प्रात्यक्षिक सुरू असताना ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या व्हिडिओनुसार, विमान कमी उंचीवर एक कौशल्यपूर्ण कृती करत असताना अचानक खाली आले आणि वेगाने जमिनीवर आदळले, ज्यामुळे मोठा आगीचा लोळ आणि धुराचे लोट उठले.
दुसरा अपघात
हा 20 महिन्यांत झालेला तेजस विमानाचा दुसरा अपघात होता. मार्च 2024 मध्ये जैसलमेर, राजस्थान येथे झालेल्या पहिल्या अपघातात वैमानिक सुरक्षित बाहेर पडला होता. मात्र, शुक्रवारी झालेला अपघात कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रदर्शनादरम्यान तेजस विमानाला झालेला पहिला घातक अपघात ठरला.
चौकशीचे आदेश
भारतीय हवाई दलाने (IAF) या अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापपन केली आहे. अपघातामागील तांत्रिक , कार्यात्मक आणि पर्यावरणीय घटक तपासले जातील.
हे देखील वाचा – भारतातील 40 कोटींहून अधिक कामगारांना मोठी भेट! 4 नवीन कामगार कायदे लागू; जाणून घ्या काय बदलणार?









