Rohit Pawar Criticized BJP : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोधनिवडून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या ‘बिनविरोध’ प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
बिनविरोध निवडणुका होणे हे चांगले असले तरी, केवळ भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होतात, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे, त्यामध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याने त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
‘मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री. प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ. नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !’
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री. प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, ना. जयकुमार रावल जी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 21, 2025
रोहित पवार यांनी यावेळी घराणेशाहीवरून भाजपवर टीका करताना म्हटले, “घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवली आहे आणि ‘PARTY WITH DIFFERANCE’ कसा आहे, हे दाखवून दिले आहे.” त्यांनी केशव उपाध्ये आणि माधव भंडारी यांच्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असा टोलाही लगावला.
लोकशाहीचा गळा घोटण्याचा आरोप
रोहित पवार यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, सत्तेचे केंद्रीकरण न होता, विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसाला निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाहिले जाते. परंतु, आज मंत्र्यांचीच पत्नी, आई किंवा नेत्याची सून बिनविरोध निवडून आणली जात आहे. निवडणुका ज्या निर्भय आणि पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित आहे, त्याला गुंडाळून ठेवले जात आहे.
सत्तेचं अमर्यादित केंद्रीकरण न होता विकेंद्रीकरण होऊन सामान्य माणसालाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेता यावं, या दृष्टीकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांकडं पाहिलं जातं… पण आज मंत्र्यांचीच पत्नी, आई, मामेभाऊ किंवा नेत्याची सून ‘बिनविरोध’ निवडून आणली जातेय.. या ‘बिनविरोध’साठी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 21, 2025
यावर निवडणूक आयोग चकार शब्दही काढत नाही. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांकडून पदे बळकावली जात असतील, तर कोट्यवधी रुपये खर्च करून निवडणुकीचा फार्स करण्याची गरज काय, असा सवाल रोहित पवार यांनी केला. यामुळे हळूहळू लोकशाही संपण्याची भीती असून, याचा सर्वाधिक त्रास सामान्य माणसाला भोगावा लागेल, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा – भारतातील 40 कोटींहून अधिक कामगारांना मोठी भेट! 4 नवीन कामगार कायदे लागू; जाणून घ्या काय बदलणार?









