Arnav’s suicide- उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या मुद्यावरून एकत्र येत आगामी मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहेत, असे आता निश्चित आहे. या मुद्यावरून ठाकरे बंधूंना पाठिंबा मिळत असल्याचे दिसताच भाजपाने तो त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी लोकल ट्रेनमध्ये हिंदी बोलण्यावरून अर्णव खैरे या मराठी विद्यार्थ्याला मारहाण झाल्यावर त्याने केलेल्या आत्महत्येला (Arnav’s suicide) भाजपा आणि शिंदे गटाने राजकीय रंग देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर या मुद्यावर आंदोलन केले. अर्णवच्या मृत्यूला मनसे आणि उबाठा जबाबदार आहे असा आरोप करीत भाजपाने नवी आघाडी उघडली आहे .
18 नोव्हेंबर रोजी मुलुंडच्या केळकर कॉलेजमधील विद्यार्थी अर्णव जितेंद्र खैरे (19) हा कॉलेजला जात असताना डोंबिवली ठाणे लोकलमध्ये हिंदी बोलल्याने काही प्रवाशांनी त्याला मराठीत का बोलत नाही, असे विचारून मारहाण केली. त्यानंतर कॉलेजमधून घरी परतल्यावर अर्णवने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, अर्णवच्या वडिलांनी पोलीस तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आधी समाजवादी पक्ष आणि नंतर भाजपाने यावरून उबाठा-मनसेवर टीका सुरू केली.

अर्णव खैरेच्या आत्महत्येच्या निषेधार्थ भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली दादरमधील शिवाजी पार्क येथे आज मूक आंदोलन करण्यात आले. भाजपा कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून, भाषा ही संपर्काचे साधन आहे, संघर्षाचे नव्हे असे फलक हातात घेत आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर भाजपा नेत्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन उबाठा आणि मनसेला सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना केली. या आंदोलनानंतर अमित साटम म्हणाले की, संपलेले राजकारण पुन्हा सुरू ठेवण्यासाठी काही नेते भाषावाद पेटवत आहेत. काहींच्या राजकीय स्वार्थामुळे अर्णवसारख्या निरपराध मराठी तरुणाने जीव गमावला. जावेद अख्तर यांनी मनसेच्या मंचावर हिंदी भाषण केले ते चालते, पण एका तरुणाने एक वाक्य हिंदीत बोलल्याने त्याला जीव द्यावा लागतो. हा कसला दुटप्पीपणा?
अमित साटम यांच्या आरोपानंतर उबाठा-मनसेनेही त्यांच्यावर पलटवार केला. उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, भाषावाद, प्रांतवादाचे विष हे भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघच पसरवत आहे आणि खापर मात्र आमच्यावर फोडत आहेत. घाटकोपरमध्ये संघाचे जोशी येऊन माझी मातृभाषा गुजराती असल्याचे जाहीरपणे म्हणाले. तोडा, फोडा आणि राज्य करा हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपा हा कपटकारस्थान करणारा पक्ष आहे. आपल्या भूमिपुत्रांनी एकत्र राहून राज्य सांभाळायचे आहे.
भाजपा नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी आंदोलन करून तिथून निघून गेल्यानंतर उबाठा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्मृतिस्थळाची स्वच्छता करून अभिवादन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी रोज पूजा होते. पण आज भाजपा नेते येणार होते म्हणून येथे पूजा करणाऱ्या व्यक्तीला अडवण्यात आले. हे चुकीचे आहे. भाजपाला शेवटी कळलेच आहे की, बाळासाहेब हवेच आहेत. पण हे लोक अर्णव खैरेच्या आत्महत्येचे राजकारण करण्यासाठी या ठिकाणी आले. हे सर्व करताना त्याच्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार सर्वांनी करावा. आपण सरकारमध्ये आहात ही गोष्ट हे लोक विसरतात का? मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रत्युत्तरात मनसे शाखा क्र. 191 येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या डिजिटल छायाचित्राला अभिवादन करून भाजपाला सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना केली. त्यावेळी उबाठाच्या किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या. देशपांडे म्हणाले की, भाजपाने सुसंस्कृतपणा अटल बिहारी वाजपेयींकडून शिकावा. शेतकरी आत्महत्या झाल्या तेव्हा भाजपा कुठे होता? राज्यात प्रत्येक सरकारच्या काळात लोकांचे मृत्यू झाले आहेत. आम्ही गुजरातच्या दंगलीचा विषय काढला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुबुद्धी द्या, असे आंदोलन अमित साटम करतील का? तपासाआधीच आंदोलन करणे म्हणजे आत्महत्येचे राजकारण आहे. भाजपाची वैचारिक दुरवस्था झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या बहिणीचा
ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाबळेश्वर नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चुलत बहीण माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. विमल ओंबळे प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्षपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे नासीर मुलाणी यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. मात्र मकरंद पाटील यांनी मुलाणींची समजूत काढली. त्यानंतर मुलाणींनी अर्ज मागे घेतला.
हे देखील वाचा –
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
बेंगळुरूमध्ये एटीएम चोरी; पोलिस अधिकारी आणि कॅश व्हॅन इन्चार्ज अटकेत; ५.७ कोटी रुपये जप्त









