Gauri palve uicide- राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे यांनी काल (Gauri palve uicide )राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र पतीच्या प्रेमप्रकरणातून पतीने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केल्याने खळबळ माजली आहे. त्यातच स्वीय सहाय्यक गर्जे हा गायब असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
या आत्महत्येची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया वरळी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी मुलीचे वडील व मामा यांना गर्जे विरोधात तक्रार दाखल करण्यास मदत केली. पोलिसांनी सुरुवातीला केवळ आत्महत्या केल्याचे म्हटले होते. मात्र दमानिया यांनी वडिलांचा जबाब आणि तक्रार नोंदवण्यास पोलिसांना भाग पाडले. त्यानंतर पती अनंत गर्जे, दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल आंधळे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. डॉ. गौरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे या केईएम रुग्णालयात दंतचिकीत्सक होत्या. त्यांचा विवाह केवळ दहा महिन्यांपूर्वीच अत्यंत थाटामाटात आणि मोठा खर्च करून झाला होता. मात्र गेले काही महिने अनंत गर्जे यांचे एका महिलेसोबत संबंध असल्याचा संशय आल्यानंतर दोघांत वाद सुरू झाला होता. कालही या दोघांचे मोठे भांडण झाले होते. बीडीडी चाळीच्या पुनर्विकसित इमारतीच्या 30 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गौरीने गळफास घेतला. त्यांचे पती अनंत गर्जे यांनी म्हटले की, ज्यावेळी त्यांनी आत्महत्या केली त्यावेळी मी घरी नव्हतो. मी आलो तेव्हा दरवाजा बंद होता. त्यामुळे मी 31 व्या मजल्यावर गेलो. तिथून खाली उतरुन 30 व्या मजल्यावर आलो. तेव्हा गौरी लटकताना पाहिली. मीच तिला रुग्णालयात नेले.
डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती झाल्यानंतर ते तातडीने मुंबईत आले. त्यांनी आरोप केला की, पतीबरोबरच्या भांडणाच्या वेळीच त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर पतीनेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे ही हत्याच आहे. या संदर्भात डॉ. गौरी यांच्या मामांनी म्हटले की, अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर होते. त्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असे. त्याची माहिती गौरीने आपल्या वडिलांनाही दिली होती. अनंत गर्जेचे चॅटिंगचा स्क्रिनशॉटही त्यांनी वडिलांना पाठवले होते. गौरी स्वतःला संपवत असताना तो घरात होता. त्यानेच नंतर तिला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे ही एक प्रकारची हत्याच आहे. त्याने आत्महत्या करताना तिला थांबवले का नाही? गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती. ती लढवय्यी होती. त्याच्या अफेअरची माहिती मिळाल्यानंतर तिने त्याला माफ केले होते. पण त्यांचे चॅटिंग सुरूच होते. त्यांचा काही दोष नाही तर मग ते पळाले का, याचीही चौकशी करण्यात यावी.
अंजली दमानिया पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, त्यांचा विवाह झाल्यानंतर ते बीडीडी चाळीतील घरातून पुनर्विकास झालेल्या टॉवरमधील 30 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहायला जाणार होते. त्यावेळी सामानाची आवराआवर करताना गौरीला गर्भपाताचे एक बिल सापडले. त्यावर एका महिलेच्या नावासह वडिलांचे नाव म्हणून अनंत गर्जे असे नाव लिहिले होते. आपल्या पतीचा विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यावर त्यांच्यात वाद सुरू झाला. तिच्या मैत्रिणी सांगतात की, ती रुग्णालयात कामावर यायची तेव्हा तिच्या चेहर्यावर भाजल्याच्या खुणा दिसायच्या. काल ती दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होती. दमानिया यांनी सवाल केला की, ड्युटीवरून दुपारी घरी गेल्यावर सायंकाळी तिचा मृत्यू झाला. यामधील चार-पाच तासांत काय घडले याचा शोध घ्यायला हवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पंकजा मुंडे यांचे पीए यांच्या पत्नीने आत्महत्या केली याबद्दल मला संपूर्ण माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहिती मिळालेली आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच त्यावर बोलता येईल.
गुन्हे दाखल
पोलिसांनी या प्रकरणी अनंत गर्ज, त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे, दीर अजय गर्जे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर मानसिक छळ करणे, त्रास देणे व आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंबंधीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पंकजा मुंडेंना अंजली दमानियांचा सवाल
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गौरी यांच्या कुटुंबियांना गुन्हा नोंदवण्यात मदत केली. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेंना या घटनेची माहिती रात्रीच मिळाली असेल. तरी त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात फोन करून माझा पीए असेल तरी तातडीने कारवाई करा, असे सांगायला हवे होते. पण त्यांनी सांगितले की, नाही मला माहीत नाही. गौरीचे आईवडील पहाटे साडेतीन वाजता पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी गौरेनी आत्महत्या केली असे म्हटले. त्याला गौरीच्या वडिलांनी आक्षेप घेतला. आईवडील कष्ट करून आपल्या मुलींना उच्चशिक्षित करतात. तरीही अशा घटना घडत असतील तर लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
मतदार यादी पडताळणीसाठी मनसे, उबाठा कार्यकर्ते घरोघरी
आण्णा लिहिलेल्या गाडीची धडक; मनोज जरांगेंच्या समर्थकाचा मृत्यू









