Smriti Mandhana Wedding : भारतीय क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. रविवारी (23 नोव्हेंबर) सांगली येथील त्यांच्या मूळ गावी हा सोहळा नियोजित होता. मात्र, स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणवल्यामुळे त्यांना तातडीने सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलमध्ये ) दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, श्रीनिवास मानधना यांना छातीत डाव्या बाजूला वेदना जाणवल्यानंतर ही लक्षणे दिसू लागली. विवाह सोहळ्याच्या धावपळीमुळे आलेला शारीरिक आणि मानसिक तणाव हे या समस्येचे कारण असू शकते. त्यांना सतत ईसीजी मॉनिटरिंगची (Monitoring) गरज भासू शकते आणि आवश्यक वाटल्यास अँजिओग्राफीही करावी लागेल.
विवाह सोहळ्याची धामधूम थांबली
स्मृती मानधना यांच्या व्यवस्थापकांनी माहिती दिली की, कुटुंबातील आरोग्य आणीबाणीच्या काळात स्मृतीला विवाह सोहळा पुढे न्यायचा नव्हता. व्यवस्थापक तुहिन मिश्रा म्हणाले, “सकाळी नाश्ता करत असताना त्यांची तब्येत बिघडली. आम्ही तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.”
स्मृती वडिलांच्या किती जवळ आहे हे सर्वांना माहीत असल्याने, ते पूर्णपणे बरे होईपर्यंत विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय तिने घेतला आहे.
काही दिवसांपासून हळदी, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक विधी उत्साहात सुरू होते. स्मृतीच्या अनेक सहकारी खेळाडू, ज्यात जेमिमाह रॉड्रीग्ज, राधा यादव, शफाली वर्मा यांचा समावेश होता, त्या हजेरी लावण्यासाठी सांगलीत पोहोचल्या होत्या. हळदीच्या समारंभात स्मृती सहकाऱ्यांसोबत आनंदाने नाचत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता.
विश्वचषकानंतर एंगेजमेंट
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एंगेजमेंट (Engagement) जाहीर केली होती. त्यानंतर पलाशने मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्येस्मृतीला गुडघ्यावर बसून प्रपोज करतानाचा भावनिक व्हिडिओही शेअर केला होता. स्मृतीने नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 434 धावा करून भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते.









