CJI Surya Kant : न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज (24 नोव्हेंबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. हरियाणातील एका खेड्यातून देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर पोहोचलेला त्यांचा प्रवास या शपथविधीमुळे पूर्ण झाला. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
पदभार स्वीकारण्यापूर्वी न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी एका मुलाखतीत आपले न्यायिक तत्त्वज्ञान आणि प्रशासकीय प्राधान्यक्रम स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुमारे 90,000 प्रकरणांना त्यांनी सर्वात मोठे आव्हान मानले आहे.
ते म्हणाले, “माझे त्वरित लक्ष न्यायिक बळाचा उत्कृष्ट वापर करण्यावर आहे, जेणेकरून प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल.” जुनी प्रकरणे त्वरित निकालात काढणे आणि कनिष्ठ न्यायालयांमधून आधी प्रकरणे निकाली काढण्याची निरोगी प्रथा पुन्हा सुरू करण्यावर त्यांनी भर दिला.
कोण आहेत सरन्यायाधीश सूर्य कांत?
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. त्यांनी हिसारमधील सरकारी महाविद्यालयातून पदवी आणि 1984 मध्ये महर्षि दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी हिसार जिल्हा कोर्टात आपल्या करिअरची सुरुवात करून 1985 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात घटनात्मक, सेवा आणि दिवाणी प्रकरणांमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. 2000 मध्ये, वयाच्या केवळ 38 व्या वर्षी ते हरियाणाचे सर्वात तरुण अॅडव्होकेट जनरल बनले.
न्यायालयीन प्रवास आणि महत्वाचे निर्णय
न्यायमूर्ती सूर्यकांत यांना जानेवारी 2004 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. 14 वर्षांहून अधिक काळ त्यांनी येथे काम केले. ते त्यांच्या कठोर कार्यशैलीसाठी आणि घटनात्मक अचूकता व सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधणाऱ्या निर्णयांसाठी ओळखले जातात.
ऑक्टोबर 2018 मध्ये ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनले आणि मे 2019 मध्ये त्यांची भारतीय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नियुक्ती झाली. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी 1,000 हून अधिक निर्णयांमध्ये योगदान दिले आहे. त्यांनी अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या 2023 च्या निर्णयासारख्या ऐतिहासिक निकालांमध्येही सहभाग घेतला आहे. सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे ते हरियाणातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.
हे देखील वाचा – India vs South Africa: गिल दुखापतग्रस्त आणि अय्यर बाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘हा’ खेळाडू करणार भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व









