Bihar Congress Expulsion : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर आता काँग्रेसने मोठा निर्णय घेत 7 नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे.
बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीने (BPCC) अंतर्गत वादळाविरुद्ध कठोर भूमिका घेत, सात नेत्यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सोमवारी ही कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईमुळे पक्षात नवीन वाद निर्माण झाला असून, असंतुष्ट नेत्यांनी याला ‘निवडणुकीतील दारुण पराभवासाठी वरिष्ठ नेत्यांना वाचवण्याचे षडयंत्र’ ठरवले आहे.
नेत्यांवर नेमका काय आरोप?
BPCC शिस्तपालन समितीचे अध्यक्ष कपिलदेव प्रसाद यादव यांनी हे हकालपट्टीचे आदेश जारी केले. एका प्रसिद्धीपत्रकानुसार, या नेत्यांनी पक्षाच्या मूळ विचारधारेपासून फारकत घेतली, संघटनात्मक नियमांचे उल्लंघन केले आणि पक्षीय व्यासपीठाबाहेर दिशाभूल करणारी विधाने केली.
शिस्तपालन समितीने स्पष्ट केले की, या नेत्यांनी वारंवार मुद्रित माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पक्षाच्या निर्णयांवर टीका केली. तिकिट विक्रीचे निराधार आरोप केले, ज्यामुळे पक्षाची प्रतिष्ठा मलिन झाली.
उमेदवारांची निवड निरीक्षक, प्रदेश निवडणूक समिती आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) यांनी केंद्रीय निरीक्षक अविनाश पांडे यांच्या संमतीने पारदर्शक पद्धतीने केली होती.
या नेत्यांचे स्पष्टीकरण असमाधानकारक होते आणि त्यांनी पक्षाच्या पाच शिस्तभंगाच्या नियमांपैकी तीन नियमांचे उल्लंघन केले आहे.
हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस सेवादलाचे माजी उपाध्यक्ष आदित्य पासवान, BPCC चे माजी उपाध्यक्ष शकीलूर रहमान, किसान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार शर्मा, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार राजन, अत्यंत मागास विभागाचे माजी अध्यक्ष कुंदन गुप्ता, बांका जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कांचना कुमारी आणि नालंदा जिल्ह्यातील रवी गोल्डन यांचा समावेश आहे.
पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष
2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षात मोठा अंतर्गत गोंधळ निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या एका गटाने शिस्तपालन समितीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यांची तक्रार आहे की, ही कारवाई वरिष्ठ नेत्यांना वाचवण्यासाठी केली जात आहे. असंतुष्ट नेत्यांचे म्हणणे आहे की, ज्यांनी निवडणूकपूर्व काळात कमजोर उमेदवार आणि युतीतील समन्वयाचा अभाव याबाबत आवाज उठवला, त्याच समर्पित कार्यकर्त्यांना पक्षातून काढले जात आहे.
या गोंधळात, बिहार महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शरबत जहाँ फातिमा यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.









