Ayodhya Ram Mandir- शेकडो वर्षे ब्रिटिशांच्या राजवटीखाली राहिल्याने भारतीयांची गुलामगिरीची मानसिकता तयार झाली आहे. ही गुलामगिरीची मानसिकता कायम राहिली. पुढील दहा वर्षांत आपल्याला ही मानसिकता मुळापासून नष्ट करायची आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत राम मंदिराच्या(Ram mandir) कार्यक्रमात व्यक्त केला. अयोध्येतील राम मंदिरात आज भव्य समारंभात मोदींच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर बोलताना ते म्हणाले की, आजपासून सुमारे 190 वर्षांपूर्वी सन 1835 मध्ये ब्रिटिश अधिकारी मॅकोले याने भारतात शिक्षणाची अशी काही व्यवस्था आणली की, ज्यातून केवळ ब्रिटिशांना कारभार चालवण्यासाठी गुलाम तयार व्हावेत. मॅकोलेने शिक्षण व्यवस्थेच्या आड भारतात गुलामगिरीची बीजे रोवली. आम्हाला स्वातंत्र्य तर मिळाले, परंतु ब्रिटिशांनी अंगात भिनलेली गुलामगिरीची मानसिकता आजही जशास तशी आहे. त्यामुळे आपल्या जे जे विदेशी ते ते चांगले आणि जे जे स्वदेशी ते ते वाईट असे वाटते.
ही गुलामगिरीची मानसिकता आहे. आगामी दहा वर्षांत ही मानसिकता आपल्याला मुळापासून उखडून टाकायची आहे. राम मंदिराचे उद्घाटन गेल्या वर्षी 2024 मध्ये झाले असले तरी मंदिराच्या आवारातील अन्य देवतांच्या सहा मंदिरांचे बांधकाम अपूर्ण होते. ते पूर्ण झाल्यामुळे आज मंदिराच्या शिखरावर धर्म ध्वज फडकवण्यात आला. राम मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाले असा संदेश ध्वजारोहणातून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी दहा वाजता अयोध्येत दाखल झाले. त्यानंतर साकेत कॉलेजपासून त्यांच्या गाड्यांचा ताफा राम मंदिराच्या दिशेने निघाला. त्याप्रसंगी मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा अयोध्यावासी उभे होते.
राम मंदिर येथे पोहोचल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम सप्त ऋषींचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत होते. त्यानंतर राम मंदिराच्या आवारातील सहा मंदिरांतील देवतांचे दर्शन घेऊन पूजन केले. 11 वाजून 50 मिनिटांच्या मुहूर्तावर मोदींच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर धर्म ध्वजाचे आरोहण करण्यात आले. त्यावेळी तिथे उपस्थित हजारो भाविकांनी रामनामाचा जयघोष केला.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी देश-विदेशातून आठ हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची या सोहळ्याला प्रमुख
उपस्थिती होती.
चार किलो वजनाचा धर्म ध्वज
आज आरोहण करण्यात आलेला धर्म ध्वज खास आहे. बावीस फूट लांबी आणि अकरा फूट रुंदी असलेला हा ध्वज उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीवर आधारित आहे. जमिनीपासून 205 फूट उंचीवर ध्वज स्थापित करण्यात आला आहे. ध्वजासाठी पॅराशूट बनवण्यासाठी जे कापड वापरतात ते कापड वापरण्यात आले आहे. त्यामध्ये रेशीम, नायलॉन आणि पॉलिमर धाग्यांचा वापर करण्यात आला आहे. ध्वजाचे वजन चार किलो आहे. ज्या स्तंभावर ध्वज फडकत आहे त्या स्तंभाचे वजन 5 हजार 100 किलो आहे.वादळी वार्यांना तोंड देण्याची या स्तंभाची क्षमता आहे.ध्वजावर सूर्य, ओम आणि कोविदार वृक्ष अशी चिन्हे आहे. कोविदार हा अयोध्येचा राजवृक्ष आहे. हा वृक्ष कांचन , रक्तकांचन, देवकांचन या नावानेही ओळखला जातो. हा ध्वज दर सहा महिन्यांनी बदलला जाणार आहे. आता रामनवमीला ध्वज बदलला जाईल.
भाजपा आणि संघ अडवाणींना विसरले
राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा जेवढ्या भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यात आला तेवढाच भव्य दिव्य आजचा ध्वजारोहण सोहळा साजरा झाला. मात्र ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन छेडून संपूर्ण देश ढवळून काढला, ज्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची परिणती बाबरी मशिदीच्या पतनात झाली त्या अडवाणींचा एका शब्दाने उल्लेख पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आणि सरसंघचालक भागवत यापैकी एकानेही आपल्या भाषणात केला नाही.
————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा
पुण्यात अजित पवार यांचा आणखी एक भूखंड घोटाळा ? ५०० कोटींची जमीन २९९ कोटींना विकली









