Ladki Bahin Yojana : राज्याच्या राजकारणात ‘गेमचेंजर’ ठरलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारातही जोरदार गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रत्येक प्रचारसभेत ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, याचे ठाम आश्वासन देत आहेत. या नेत्यांनी ‘लाडक्या बहिणींच्या’ आशीर्वादामुळेच सरकारला मोठा विजय मिळाल्याचे वारंवार सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची गॅरंटी
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडक्या बहिणींना’ भावनिक साद घातली.
यो “काही लोक म्हणत होते की हे सरकार लाडकी बहीण योजना बंद करेल. पण, मी माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना बंद होऊ देणार नाही,” असा शब्द फडणवीस यांनी यावेळी दिला.
लाडकी बहीण योजनेसोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज, पीक विमा आणि अन्य शेतकरी हिताचे निर्णय सरकार कधीही थांबवणार नाही. ‘आम्ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आश्वासन देणारे लोक नाही, तर लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
त्याआधी नाशिकच्या सटाणा येथील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय ‘लाडक्या बहिणींचा आशीर्वाद’ असल्याचे सांगत, शिंदे यांनी योजनेला विरोध करणाऱ्यांचे (विरोधकांचे) मनसुबे या बहिणींनी उधळून लावले, असे ते म्हणाले. “एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही,” असे आश्वासन देत त्यांनी लवकरच योजनेतील केवायसी (KYC) च्या अडचणी देखील दूर करण्याचे सांगितले.
हे देखील वाचा – T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबला ‘या’ तारखेला; फायनल अहमदाबादमध्ये होणार









