Raj Thackeray : ‘आयआयटी बॉम्बे’ (IIT Bombay) या संस्थेच्या नावावरून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री सिंह यांनी ‘आयआयटीच्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले, ते ‘मुंबई’ केले नाही, ही चांगली गोष्ट आहे,’ असे विधान केले होते.
या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे विधान केंद्र सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी थेट ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट लिहून गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरेंची टीका: केंद्र सरकारच्या ‘बॉम्बे’ हट्टामागील मानसिकता
मराठी अस्मिता आणि मुंबईच्या मुद्द्यावर नेहमीच ठाम भूमिका घेणारे राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र सिंह यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे स्पष्ट प्रतीक आहे. अनेक दशकांपासून मराठी नेत्यांनी आणि जनतेने मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा जो डाव उधळला आहे, त्याबद्दलची ‘मळमळ’ आता बाहेर पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ‘मुंबई’ हे नाव आपल्या मुंबा आईच्या (मुंबईची मूळ देवी) नावावरून आले आहे. त्यामुळे हे नामकरण केंद्रातील काही लोकांना खटकत आहे. हे लोक मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करण्याचा कट रचत आहेत.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
— Raj Thackeray (@RajThackeray) November 26, 2025
आणि…
‘आधी मुंबई, मग MMR गुजरातला जोडण्याचा प्रयत्न’
राज ठाकरे यांनी या वादाला गंभीर राजकीय वळण दिले. त्यांनी चंदीगडचे उदाहरण दिले. केंद्र सरकारने पंजाबच्या हातून चंदीगड काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण सर्वपक्षीय विरोधामुळे त्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली.
राज ठाकरे यांनी अत्यंत खळबळजनक आरोप करताना सांगितले की, “असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार.” आधी मुंबई आणि नंतर संपूर्ण एमएमआर (MMR) परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी समस्त मराठी माणसाला जागा होऊन, या उद्योगांवर आणि केंद्रीय हस्तकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
मनसेचा कठोर इशारा आणि भाजप नेत्यांवर निशाणा
केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याला ‘निर्लज्ज आणि बेशरम’ संबोधून त्यांचा तीव्र निषेध केला. महाराष्ट्राचा अपमान करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
जितेंद्र सिंह यांचे नेमके विधान
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथे एका कार्यक्रमात मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधान केले होते.”आयआयटी बॉम्बेबद्दल बोलायचे झाल्यास, मी देवाचे आभार मानतो की त्याचे अजूनही तेच नाव आहे, तुम्ही ते ‘मुंबई’ असे बदललेले नाही आणि ही तुमच्यासाठी अजून एक कौतुकास्पद बाब आहे. आयआयटी मद्राससाठीही हीच गोष्ट लागू होते. ते मद्रासच राहिले आहे.”
केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana : ‘देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत…’; लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांचे महत्त्वाचे वक्तव्य









