Gulabrao patil- आमच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे आमच्याकडे मालच माल आहे. तुम्ही काळजी करु नका. 1 तारखेला रात्री घराबाहेर झोपा, लक्ष्मी येईल असे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao patil) यांनी केले आहे. मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मी फिरणार आहे. त्यामुळे तुम्ही तिचे स्वागत करायला बाहेरच झोपा असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजली आहे.
नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे निवडणूक प्रचारसभेत बोलतांना भाजपा व राष्ट्रवादी या महायुतीतील मित्र पक्षांवर त्यांनी टीका केली.
गुलाबराव पाटील जाहीर सभेत म्हणाले की, आमच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे आमच्याकडे मालच माल आहे. एकनाथ शिंदे यांनी या भागाला 350 कोटी रुपये दिले आहेत. लोकांनाही माहित आहे की, या भागात कामे कोणी केली. आता ते (अजित पवार) सांगताहेत की भगूर पाणीपुरवठा योजना आम्ही आणली. ती मी मंजूर करुन घेतलेली आहे. ज्यांची मुले आहेत, दुसर्याुची मुले खेळवू नये. मी तुम्हाला हवे तर या पाणीपुरवठा योजनेचा शासन निर्णय दाखवू शकतो. निवडणुकीत ते काहीही करतील. मटणाची पार्टी देतील, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मटण त्याचं खा, पण बटण आमचे दाबा. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री या भागात लक्ष्मी फिरली होती. तशीच लक्ष्मी यावेळेसही मतदानाच्या आदल्या रात्री फिरणार आहे. तिच्यासाठी तुम्ही घराबाहेरच झोपा. तिचे स्वागत करा. विधानसभेवेळी तिने सर्वांना उठवले, ती म्हणाली उठ भक्ता मी तुझ्या दाराशी आलेले आहे. यावेळीही 1 तारखेला तुम्ही घराच्या बाहेरच झोपा. त्या रात्रीही ती फिरणार आहे. त्याचा लाभ घ्या.
गुलाबराव पाटील यांच्या बेपर्वा, बेताल वक्तव्याबद्दल संताप पसरला आहे. मतदाराला उघड दोष देऊन त्यांचा अपमान करायचा, आपण मतदारांना पैसे वाटतो हे निर्लज्जपणे हंसत हंसत सांगायचे हे आता नेत्यांमध्ये सामान्य होऊ लागले आहे. त्यांना जनतेच्या प्रतिक्रियेची पर्वा राहिली नाही, पैशाने कसाही विजय मिळवता येतो, अथवा मतमोजणीत गडबड करून मते मिळतील याची खात्री झाल्याने नेते वाटेल ते बोलू लागले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे असा सूर सामान्य जनतेत उठत आहे.
दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सारवासारव केली. ते म्हणाले की, गुलाबरावांच्या म्हणण्याचा अर्थ नगरविकासच्या माध्यमातून केवळ मोठी शहरेच नाही तर लहान शहरे देखील विकसित होतील. त्यासाठी आम्ही कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही. असाच गुलाबरावांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
शेवगा शेंग ४०० रुपये किलो इडलीचे सांबार महागणार
अजित पवारांचा राजीनामा घ्या अन्यथा दिल्लीत शहांना भेटेन! अंजली दमानियांचा इशारा









