Pune Metro Phase 2 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती) महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) पुणे मेट्रो विस्तारीत प्रकल्पांना औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी मंजुरीमुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे जाळे 100 किमीचा टप्पा पार करणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे ‘महाराष्ट्र सुपरफास्ट’ म्हणत स्वागत केले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे ही माहिती दिली, तर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी एक्स पोस्टद्वारे पुणेकरांना ही आनंदाची बातमी दिली.
दोन नवीन मेट्रो मार्गिकांचा विस्तार
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 31.64 किलोमीटर लांबीच्या दोन महत्त्वाच्या मार्गिकांना मंजुरी मिळाली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ₹9,857.85 कोटी खर्च अपेक्षित असून, पुढील 5 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या विस्तारामुळे एकूण 28 उन्नत (Elevated) स्थानके तयार होणार आहेत.
- मार्गिका 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला):
- लांबी: 25.52 किलोमीटर
- स्थानके: 22 उन्नत स्थानके
- फायदा: हा मार्ग खराडी, हडपसर, मगरपट्टा आयटी पार्क, स्वारगेट, कर्वेनगर आणि खडकवासला यांसारख्या दाट लोकवस्तीच्या, औद्योगिक आणि व्यावसायिक भागांना थेट जोडेल.
- मार्गिका 4अ (नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग):
- लांबी: 6.12 किलोमीटर
- स्थानके: 6 उन्नत स्थानके
- फायदा: हा लहान पण महत्त्वाचा मार्ग शहरातील मध्यवर्ती भाग आणि वारजे-माणिकबाग परिसरातील निवासी समूहांना वेगवान कनेक्टिव्हिटी देईल.
वाहतूक कोंडीत घट आणि कनेक्टिव्हिटीला गती
या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचा पूर्व, मध्यवर्ती, पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भाग थेट एकमेकांशी जोडला जाणार आहे. प्रामुख्याने हडपसर, मगरपट्टा परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्या (IT Hub), शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक विभागांना याचा मोठा फायदा होणार आहे.
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे मार्ग आणि मुंबई-बेंगळूरू महामार्ग यांसारख्या शहरांतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुरक्षित होईल, तसेच हरित व शाश्वत वाहतुकीला चालना मिळेल.
हे देखील वाचा – Commonwealth Games 2030 : भारतासाठी ऐतिहासिक क्षण! 2030 कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद अहमदाबादकडे; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा









