BJP vs UBT: मुंबईतील बोरिवली पूर्व भागात भाजपा (BJP) पदाधिकारी गणेश खणकर आणि उबठा (UBT) शाखाप्रमुख सुबोध माने यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मतदार याद्यांतील घोळाचा वाद थेट टँकर माफियापर्यंत गेला.
या वादाची सुरुवात प्रभाग क्रमांक ११ मधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या आरोपावरून झाली. शाखाप्रमुख सुबोध माने यांनी काल दुपारी यासंदर्भात एक व्हिडिओ (Video) बनवून मतदार यादीतील त्रुटी उघड करण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच खणकर आणि सुबोध माने यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद हाणामारीपर्यंत गेला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या मते, खणकर यांनी आधी एका महिलेवर हात उचलला होता. त्यामुळे माने यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या घटनेनंतर सुबोध माने यांच्या समर्थकांनी रात्रभर दहिसर पोलीस स्टेशनबाहेर तळ ठोकला होता.
दुसरीकडे, पाण्याच्या टँकरचे पार्किंग हे वादाचे कारण असल्याचे खणकर यांचा मुलगा आदित्यचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, माने यांचे टँकर चुकीच्या ठिकाणी उभे केले जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याविरोधात खणकर यांनी मोर्चा काढला होता. याच रागातून माने, त्यांची पत्नी आणि सहकाऱ्यांनी खणकर यांच्यासोबत वाद घालून मारहाण केली. दरम्यान, मारहाणीच्या आरोपावरून पोलिसांनी सुबोध माने यांना ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा-
पालिकेच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण व खंडणीचे गंभीर आरोप- मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार
न्यायालयाचे आधीचे निकाल फिरवण्याची प्रवृत्ती चिंताजनक; सुप्रीम कोर्टाची नाराजी









