Uddhav and Raj thakre : राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Uddhav and Raj thakre ) यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दीड तास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मनसे आणि उबाठा मधील जागावाटपावर चर्चा झाली. उबाठातून फुटून शिंदे गटाकडे गेलेल्या मतदारसंघात उबाठाचा उमेदवार द्यायचा की मनसेचा यावर प्रामुख्याने चर्चा झाली. यावेळी आमदार अनिल परब आणि वरुण सरदेसाई, अविनाश जाधव उपस्थित होते.
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. मनसेची ताकद असेल तिथे मनसे आणि उबाठाची ताकद असेल तिथे उबाठा हे मूळ सूत्र असले तरी ज्या 42 मतदारसंघांतील उबाठाचे आजी-माजी नगरसेवक शिंदेंनी फोडले तेथे मनसेची ताकद असली तरी सन्मानाचा मुद्दा म्हणून उबाठाने त्या जागांची मागणी केल्याने पेच निर्माण झाला आहे. माहीममध्ये दोन, शिवडी, वरळी, भांडूप, विक्रोळी या जागा मनसेने मागितल्या आहेत. त्यात बोरिवलीच्या एका जागेवरील मनसेची महिला उमेदवार ही नंतर शिंदे गटात गेली, आता ती उबाठात आहे. त्यामुळे उबाठाला ही जागा हवी आहे, पण मनसेची तिथे ताकद असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. अशा जागांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी आज बैठक झाली. यापूर्वी उबाठा आणि मनसेतील नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चेची एक फेरी झाली आहे. संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत या
चर्चेची जबाबदारी अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण यांच्यावर आहे तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावर आहे. यावेळी उबाठाने सुरुवातीला प्रत्येक मतदारसंघात दोन जागा देण्याचा प्रस्ताव मांडला, तर मनसेने काही ठिकाणी तीन जागांची मागणी केली आहे.
मनसेकडून साधारण 70-75 जागांची मागणी केली गेली आहे. शंभर टक्के जिंकल्या जातील अशा काही जागा आम्हाला हव्या, अशी मनसेची मागणी आहे. मागील आठवड्यात बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्या भेटीतही जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. त्यानंतर दोन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीतही जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. आता या बैठकांना वेग आला आहे. उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे मात्र म्हणाल्या
की, उद्या मुंबईत त्रिभाषा सूत्र या विषयावर कार्यक्रम आहे. यावेळी कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते भेटले.
मात्र आज जागावाटपाबाबतच चर्चा झाली. उबाठाच्या मते 2017 च्या पालिका निवडणुकीच्या निकालावरून जागावाटपाचे धोरण ठरवायला हवे, तर मनसेचे म्हणणे आहे की, 2022 नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार जागा वाटप करणे योग्य राहील. यामुळे जागावाटपाच्या धोरणावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या तणावाचे निराकरण करण्यासाठी आणि युती होण्याअगोदर सर्व मुद्दे स्पष्ट करण्यासाठी आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ येथे आले होते.
सध्या महाविकास आघाडीमध्ये उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. काँग्रेसचा जाहीर विरोध असला तरी मागील काही दिवसांपासून मनसेला आघाडीमध्ये सामील करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनीही मनसेच्या सहभागाबाबत सकारात्मक भावना व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग ऐकत नसल्याने पुढे कायकरायचे यावरही आज चर्चा झाली.
हे देखील वाचा-
:फुगा फुटतोच ! अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण ! मुंबई-आग्रा महामार्गवर आंदोलन









