Weather Update : बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं महाभयंकर चक्रीवादळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या चक्रीवादळानं श्रीलंकेमध्ये सध्या मोठा धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळाला डिटवाह असं नाव देखील दिलं आहे. या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठी जीवितहानी झाली असून हे चक्रीवादळ आता हळुहळु भारताच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच काही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
श्रीलंकेमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत तब्ब्ल ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही २३ लोक बेपत्ता आहेत. बचाव पथकाचं काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार आता पुढील १२ तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी वेग पकडणार असून, हे वादळ तितकच वेगाने पुढे सरकरणार आहे. या चक्रीवादळाचा भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
मागच्या २४ तासांमध्ये श्रीलंकेमध्ये तब्बल ३०० मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला आहे. अतिमुसळधार पावसामुळे देशातील अनेक ठिकाणी लँडस्लाइडच्या घटना देखील वाढल्या आहेत. दरम्यान त्यानंतर आता हे चक्रीवादळ भारताकडे येत असून, या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत.
दरम्यान चक्रीवादळ डिटवाह हे आता भारताकडे येत असून, या पार्श्वभूमीवर आयएमडी कडून चक्रीवादळापूर्वीचा इशारा जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे तीस तारखेपर्यंत या राज्यांमध्ये हवामान अतिशय खराब राहणार असून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांना होणार असलयाचे दिसून येत आहे, मात्र महाराष्ट्रातसुद्धा काही ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहणार असून, सोसाट्याचा वारा सुटण्याची जास्त शक्यता आहे.









