Ind vs SA : विराट कोहलीने (Virat Kohli) रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी 52 वे शतक ठोकले आणि भारतीय संघाने 17 धावांनी विजय मिळवला. कोहलीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे क्रिकेट जगतात त्याच्या श्रेष्ठत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
सामान्यतः खेळाडूंचे कौतुक करताना जपून बोलणारे माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधील (ODI Cricket) स्थानाबद्दल मोठे विधान केले आहे.
गावसकरांकडून दुर्मिळ कौतुक
मध्यंतरीच्या वेळी एका ;चॅनेलवर बोलताना गावस्कर म्हणाले की, कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक असा टप्पा गाठला आहे, जिथे फार कमी फलंदाज पोहोचू शकले आहेत.
“हे फक्त माझे मत नाही. त्याच्यासोबत आणि विरुद्ध खेळलेल्या सर्व खेळाडूंचे एकमत आहे की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सर्वात महान फलंदाज आहे,” असे गावस्कर म्हणाले.
52 एकदिवसीय शतकांचा हा आकडा कोहलीला खूप उंचीवर घेऊन जातो. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी, दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आणि दबावाखाली उत्तम खेळ करण्याची वृत्ती यामुळे त्याचे महत्त्व वाढले आहे.
पॉन्टिंगचाही मिळाला पाठिंबा
गावस्कर यांनी आपल्या मताला बळ देण्यासाठी माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगचा संदर्भ दिला. पॉन्टिंगने नुकतेच कोहलीला त्याने पाहिलेला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हटले होते.
“एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीकडून स्तुती मिळणे खूप दुर्मिळ गोष्ट आहे,” असे गावस्कर यांनी नमूद केले. पॉन्टिंगसारखा प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा कोहलीला सर्वोत्तम म्हणतो, तेव्हा त्याच्या महानतेवर कोणताही वाद शिल्लक राहत नाही, असे त्यांचे मत आहे.
तेंडुलकरच्या विक्रमावर मात
सचिन तेंडुलकरच्या 51 एकदिवसीय शतकांचा विक्रम अनेक वर्षे अजेय मानला जात होता. पण कोहलीने तो मागे टाकला आहे.
याबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले, “सचिन 51 शतकांसह खूप वर होता, पण जेव्हा तुम्ही महान सचिन तेंडुलकरला मागे टाकता, तेव्हा तुम्ही कोणत्या उंचीवर आहात हे सिद्ध होते.” कोहली सध्या एका अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे तो या शिखरावर जवळजवळ एकटाच उभा आहे.
आजच्या वेगवान क्रिकेट युगात आणि प्रचंड दडपणाखालीही कोहलीने सातत्याने विक्रम रचणे हे त्याच्या महानतेचे प्रतीक आहे, असे गावसकर यांनी स्पष्ट केले.









