NIA raids – राष्ट्रीय तपास संस्था (NIA )ने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. शाहीन शाहिदच्या लखनौ (Lucknow) येथील घरासह जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील आठ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची मदत घेतली. तर महत्त्वाच्या आरोपींच्या घरांच्या झडती घेऊन कागदपत्रे जप्त केली.
एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉ. आदिल आणि जसीर बिलाल यांचे काझीगुंडमधील घर, शोपियान येथील मुफ्ती इरफान यांचे घर, पुलवामाच्या कोइल येथील डॉ. मुझम्मिल याचे घर आणि सांबुरा येथील अमीर रशीद याच्या घराची झडती घेतली. लखनौमधील डॉ. शाहीन शाहिद आणि तिचा भाऊ डॉ. परवेझ अन्सारी यांच्या घरांवरही छापे टाकले. लाल किल्ला बॉम्बस्फोट कटात जैश-ए-मोहम्मदच्या आंतरराज्यीय व्हाईट-कॉलर मॉड्यूलची भूमिका असल्याचा संशय आहे. एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी यापूर्वीही संबंधित ठिकाणांची छाननी केली होती.
लखनौमध्ये एनआयएच्या पथकाने कैसरबाग आणि मडियां भागात डॉ. शाहीन शाहिद व डॉ. परवेझ अन्सारी यांच्या घरांवर टाकलेला छापा सुमारे पाच तास टाकला. या छाप्यादरम्यान महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खंडारी बाजार परिसरातील गल्ल्या सील केल्या होत्या. यापूर्वी विशेष न्यायालयाने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील डॉ. मुझम्मिल शकील, डॉ. शाहीन सईद, मुफ्ती इरफान अहमद आणि अदील अहमद या चार आरोपींच्या कोठडीत शनिवारी १० दिवसांची वाढ केली आहे.









