BMC News: प्रारूप मतदार यादीतील चुका, बदलेले मतदान केंद्र आणि दुबार नावे पडताळणीसाठी निवडणूक कर्तव्यावर असलेले महापालिकेचे कर्मचारी आजपासून मतदारांच्या घरोघरी जात आहेत. मात्र, वॉर्डातील विस्तीर्ण झोपड्या आणि चिंचोळ्या मार्गातील सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांची पडताळणी करताना पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आल्या आहेत.
अनेक गोष्टींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.
मुंबईतील वसाहती, गृहनिर्माण संकुले, इमारतीतील मतदारांना १ डिसेंबरपासून पालिका कर्मचारी भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. मात्र शहरातील अनेक वॉर्डात विस्तीर्ण अशा झोपडपट्ट्या आहेत. या झोपड्यांमध्ये लहान मोठ्या गल्ल्यांमधून मतदाराने दिलेल्या घराचा पत्ता शोधताना अनेक अडचणी पालिका कर्मचारांना येत आहेत. काही ठिकाणी भर दुपारी वस्तीत माणसांची वर्दळ कमी असते. तर मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन मतदार शोधणे पुरुष कर्मचाऱ्यांना खूपच आव्हान असल्याचे वांद्रे बेहरामपाडा येथे कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तशीच काही परिस्थिती गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, भायखळा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे.
उपनगरात मोठ्या प्रमाणात झोपड्याप्रमाणे एसआरए पुनर्वसन इमारती आहेत. या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी दिवसा घरातील माणसे कामावर असतात अशावेळी सात-आठ जिने चढउतार करून कोणीच सापडत नाही. शिवाय संबंधित मतदाराचे शेजाऱ्यासमवेत भाडणे असल्याने योग्य सहकार्य मिळत नाही, असे अनेक अनुभव कर्मचाऱ्यांचे आहेत. अनेक ठिकाणी मतदार यादीत असलेल्या मतदाराच्या घराच्या पत्यावर दिवसा कोणीही सापडले नसल्याने अचूक माहिती कशी मिळणार, असा प्रश्न आता दुबार मतदारयादीची पडताळणी करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांसमोर आहे.
मात्र, दुबार मतदार किंवा मतदार यादीतील चुका, बदलेले मतदान केंद्र, अशी माहिती पडताळणी करतानाही अचूक माहिती पालिकेला मिळाली नाही तर एवढ्या कमी वेळेत दुबार मतदारांचा घोळ पालिका कसा निस्तरणार, असा सवाल पालिका कर्मचाऱ्यांचे हाल पाहून राजकीय कार्यकर्त्यांना पडला आहे.
हे देखील वाचा-









