Renuka Chaudhary pet dog controversy : काँग्रेस खासदार(Congress MP) रेणुका चौधरी (Renuka Chaudhary)या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी आपला पाळीव कुत्रा घेऊन संसद परिसरात आल्या. त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हा लहान आहे आणि अजिबात नुकसान न करणारा प्राणी आहे. संसदेत चावणारे दुसरेच आहेत, कुत्रे नाहीत. या वाक्यावर भाजप खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला.
रेणुका चौधरी यांना विचारण्यात आले की, त्या कुत्र्याला संसदेत का घेऊन आल्या आहेत, तेव्हा त्या म्हणाल्या की यात काय अडचण आहे ? हा कुत्रा संसद परिसरातच गाडीत बसून राहिला. त्याला संसद भवनाच्या आत नेण्यात आले नाही. रेणुका चौधरी राज्यसभा खासदार आहेत आणि २०२४ मध्ये तेलंगणातून राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या याआधी महिला व बाल विकास आणि पर्यटन मंत्रालयात स्वतंत्र प्रभार मंत्री होत्या. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री देखील होत्या. त्या दोन वेळा लोकसभा खासदार होत्या आणि अनेक संसदीय समित्यांच्या सदस्यही होत्या.
रेणुका चौधरी यांच्या कृत्यावर भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी नाराजी व्यक्त करीत म्हटले की, रेणुका चौधरी कुत्रा घेऊन संसदेत आल्या हे चुकीचे आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. संसदेत पाळीव प्राणी आणणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. संसद भवन परिसर व्यवहार आणि आचरण नियम आणि लोकसभा हँडबुक फॉर मेंबर्स अंतर्गत चुकीचे आहे. नियमांनुसार संसद भवन परिसरात केवळ अधिकृत व्यक्ती, वाहने आणि सुरक्षा मंजुरी मिळालेले साहित्यच नेले जाऊ शकते. पाळीव प्राण्यांना परिसरात प्रवेश करण्याची परवानगी नाही. हा नियम संसदेची सुरक्षा शाखा लागू करते. लोकसभा हँडबुकमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, सभागृहात किंवा संसद भवनात कोणतीही अशी वस्तू, जीव किंवा सामग्री आणली जाऊ शकत नाही ज्यामुळे सुरक्षा किंवा प्रतिष्ठेवर परिणाम होईल. पाळीव प्राणी या श्रेणीत येतात, त्यामुळे त्यांना परवानगी नाही.









