Cash Clash in Voting – आज 38 नगरपंचायत आणि 226 नगरपरिषदेसाठी मतदान झाले. उर्वरित मतदान 20 डिसेंबरला होऊन 21 डिसेंबरला एकत्रित मतमोजणी होईल. आजचे मतदान तणावातच झाले. अनेक ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेत राडा झाला. भरारी पथकांनी कोट्यवधीची रोकड पकडली. नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. नियमांचे उल्लंघन झाले.तर येवल्यासह ४४ ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान सुरु होते.
मनसे आणि उबाठाने या निवडणुकीत लक्षच दिले नाही. मात्र अजित पवार गट, शिंदे सेना आणि भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी धुवांधार प्रचार केल्यावर आज मतदानावेळी स्थानिक आमदार मैदानात उतरून देखरेख करीत होते. प्रामुख्याने शिंदे सेना आणि भाजपा यांच्यात अनेक ठिकाणी वाद झाले.
तर अजित पवार गटाच्या घडाळ्याच्या पत्रकासह पैशाची पुडकी अनेक ठिकाणी पकडली गेली. भ्रष्टाचार मुक्तीची घोषणा देणार्या या तीनही पक्षांनी सत्तेसाठी पैशांचा पाऊस पडला. रायगड, बदलापूर, रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात वाद झाले. बदलापूर, मुक्ताईनगरात बोगस
मतदार सापडले.
आजच्या मतदानात रत्नागिरी, सिंधुदुर्गात चांगले मतदान झाले. मात्र रायगडात राजकीय तणाव असूनही मतदान तुलनेने कमी झाले. नंदुरबार, जालना व चंद्रपुरात सर्वात कमी मतदान झाले. ठाण्यात केवळ 47 टक्के मतदान झाले. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झाले.
मतदानानंतर भाजपा नेते नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्गात यावेळी कणकवली (75 टक्के), सावंतवाडी (65 टक्के), वेंगुर्ला (71 टक्के), मालवण (70 टक्के) या चारही नगरपालिकेत विक्रमी मतदान झाले. यासाठी मी मतदारांचे आभार मानतो.
एकनाथ शिंदेंनी मालवणात पैशाच्या बॅगा आणल्या वैभव नाईकांचा आरोप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशाच्या दोन मोठ्या बॅगा आणल्या. या बॅगांमधील पैशांचे मालवणमध्ये वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. नाईक यांनी एक्स सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौर्यावर असताना रविवारी हेलिकॉप्टरने मालवणमध्ये हेलिपॅडवर उतरले. त्या प्रसंगाचा व्हिडिओ नाईक यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर त्यांच्या मागे दोन माणसे हातात दोन मोठ्या काळ्या बॅगा घेऊन चालताना दिसतात.
या व्हिडिओच्या आधारे नाईक यांनी असा दावा केला की, मुंबईहून सिंधुदुर्ग दौर्यावर केवळ निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी येताना शिंदे यांना एवढ्या मोठ्या बॅगा भरून सामान भरून आणण्याची गरजच नव्हती. त्यामुळे त्या बॅगांमध्ये पैसेच होते हे स्पष्ट आहे.
याबाबत भाजपा नेते बावनकुळे म्हणाले की, स्थानिक पातळीवर काय घडले माहीत नाही, पण जनता ही फडणवीस यांच्या मागे आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही शिंदे यांच्यावर हाच आरोप झाला होता. त्यावेळी ते भाजपा खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिकला हेलिकॉप्टरने आले होते.
हेलिकॉप्टरमधून ते उतरल्यावर त्यातून दोन मोठ्या काळ्या बॅग काढण्यात आल्या होत्या. या बॅगातून शिंदे यांनी वाटपासाठी पैसे आणले असा आरोप उबाठाचे संजय राऊत यांनी केला होता. मात्र बॅग तपासल्यावर त्यात काही गैर आढळले नाही. मी एवढे कपडे नेहमीच सगळीकडे घेऊन जातो, असा खुलासा शिंदे यांनी केला होता. आज त्यांच्यावर तसाच मोठा गुन्हा दाखल झाला आहे.
मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
अमरावती – 49, भंडारा -46, पालघर – 60, रायगड – 54, अहिल्यानगर – 68, धुळे – 52, अकोला – 51, भंडारा – 46, चंद्रपूर – 39, पुणे – 51, कोल्हापूर – 68, सांगली – 75, हिंगोली – 53, धाराशिव – 70, नागपूर – 85, रत्नागिरी – 57, नंदुरबार – 32, वर्धा – 44, सातारा – 61, लातूर – 62, नांदेड – 63, सिंधुदुर्ग – 70, जळगाव – 44, नाशिक -46, बुलडाणा -49, गोंदिया – 45, गडचिरोली – 54, सोलापूर – 49, हिंगोली – 53 जालना – 65, यवतमाळ – 45, वाशिम – 46, परभणी – 52, ठाणे – 47, अकोला – 51, संभाजीनगर – 71, बीड – 64.
हे देखील वाचा –
संसदेचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब
महात्मा फुलेंचा वाडा भुजबळांच्या समता परिषदेला देण्याचा प्रयत्न ! संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध
पाकिस्तानात इम्रान खान समर्थकांचा उद्रेक! अखेर बहिणीला 20 मिनिटे भेट घेऊ दिली









