Sanjay Raut Raj Thackeray Meeting : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या गंभीर कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. या सक्तीच्या विश्रांतीनंतर राऊत पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. नुकतेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घरी जाऊन राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
संजय राऊत अगदी आजारी असतानाही 17 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांनी शिवाजी पार्क येथे हजेरी लावत आदरांजली वाहिली होती.
राजकीय नेत्यांकडून प्रकृतीची विचारपूस
संजय राऊत आजारी असल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या घरी राजकीय भेटीगाठी वाढल्या, ज्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे, तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊत यांच्या घरी आले. या दोन नेत्यांमध्ये जवळपास 25 ते 30 मिनिटे चर्चा झाली.
राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली की, संजय राऊत आजारी पडल्यापासून राज ठाकरे सतत त्यांच्या संपर्कात होते. ते त्यांच्या उपचारांबाबतही चर्चा करत होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी राऊत यांना ‘ज्या प्रकारचा आजार आहे त्यानुसार तुम्हाला राहावे लागेल आणि लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा,’ असा प्रेमळ सल्ला दिला.
राज ठाकरेंसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनीही संजय राऊत यांची मुंबईत एका लग्न सोहळ्यादरम्यान भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यासोबतच, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांच्या प्रकृती सुधारत असल्याचा विश्वास व्यक्त केला. “संजय लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत, तर तलवार घेऊन मैदानात दिसतील,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या सक्रियतेचे संकेत दिले.
सध्या तरी राऊत सार्वजनिक जीवनात दिसत असले तरी, विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांची भेट घेतली गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटींमागे नेमके कोणते अर्थ दडलेले आहेत, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
हे देखील वाचा – IndiGo Flight Disruption : 200 हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द: प्रमुख विमानतळांवरील गोंधळाचे नेमके कारण काय?









