Gondia EVM : नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत चाललं आहे. काही ठिकाणी २ डिसेंबरला नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकली गेली. त्यामुळे साहजिकच या ईव्हीएममध्ये उमेदवारांचे पुढील भवितव्य कैद झाले आहे. ज्याठिकाणी मतदान झाले त्याठिकाणी स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मात्र यावरून आता प्रत्यारोपाच्या मालिकांना सुरवात झाली. गोंदियाच्या सालेकसा येथे ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून मोठा राडा झाला आहे तर सांगलीच्या मतदानात अचानक भर झाली असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे.
गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान २ डिसेंबरला मतदान पार पडले. त्यानंतर आता याठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना तसेच शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांनी तहसिल कार्यालयाला घेराव घातला. तब्ब्ल १२ तास कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडला होता. त्यानंतर रात्री उशिरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला यासंदर्भात अहवाल पाठवला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार आहे हे महत्वाचे ठरणार आहे.
याबाबत काँग्रेस नेते प्रफुल अग्रवाल म्हणाले की, शासन आणि प्रशासन या दोघांनी संगनमताने ईव्हीएमची सील तोडली होती. आमचा एकही प्रतिनिधी बोलवला गेला न्हवता. ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आली. मात्र निवडणूक आयोगाला चुकीचा अहवाल पाठवून आमच्या पक्षातील लोक तिथे उपस्थित होते असं खोट सांगितलं गेलं. निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात आली असा आरोप देखील त्यांनी केला. परस्पर निवडणूक अधिकाऱ्यांनी सील केलेल्या पेट्या उघडल्या आणि पुन्हा सील करून स्टाँगरूममध्ये जमा केल्या असं देखील ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी हे केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील काँग्रेसचे बबलू कटरे यांनी केली.
तर दुसरीकडे सांगलीतील आष्टा नगरपरिषदेत मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करत शरद पवार गटासह शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला. याठिकाणी स्टाँगरूमबाहेर बऱ्याच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच याठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप केला. वेबपोर्टलवरून मतदानाच्या टक्केवारीबाबत आकडेवारी मतदानाच्या दिवशीच मिळाली होती. एकूण मतदार संख्या ३३ हजार ३२८ दाखवली, एका प्रभागात १३११ मतदान असताना तिथे ४ हजार मतदान कसे दाखवले गेले. ६ नंबर प्रभागात एकूण मतदान ३ हजार ५६ आहे, आणि यात मतदान २३९४ झाले आहे तिथे १७९५ मतदान दाखवले आहे. यासारख्या अनेक त्रुटी यामध्ये दिसून येत आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे असा दावा देखील उमेदवारांनी केला आहे.
हे सगळे महाराष्ट्रात घडते आहे हे दुर्दैवी. हा गोंधळ होण्याचे कारणच न्हवते. ईव्हीएम सारख्या अत्यंत महत्वपूर्ण यंत्रणेबाबत इतका निष्काळजीपणा का? जर हायकोर्टाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकली तर हि ईव्हीएम बाबतीतील सुरक्षितता का पाळता आली नाही? मुळात ईव्हीएम सारख्या मशीन वरून वाद होणं हेच मुळात न पटणार. आणि सांगलीत मतदानाचा आकडा अचानक वाढला पण तो खरच वाढला का? या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत त्यामुळे या सगळ्याची खोलवर चौकशी होणं अत्यंत महत्वाचं.
याचबरोबर भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या या आरोपाचे खंडन केले आहे. काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात. त्यांना निकालाची सतत धाकधूक असते. त्यातून नैराश्य येते आणि हे नसते आरोप केले जातात. निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असावा अशी थेट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे देखील वाचा – Union Agriculture Minister : महाराष्ट्रातील अतिवृष्टीसंदर्भात आर्थिक मदतीबाबत राज्यसरकारची बनवाबनवी?









