Shital Tejwani : अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज शीतल तेजवानी (Shital Tejwani) हिची पुणे न्यायालयात तब्बल तीन तास सुनावणी झाली. या सुनावणीवेळी आर्थिक गुन्हे विभागाने 11 पानी रिमांड कॉपी सादर केली. तर महसूल विभागाने 5 पानी अहवाल सादर केला. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी शीतल हिचा या प्रकरणाची सूत्रधार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने शीतलला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आजच्या सुनावणीत पार्थ पवार यांचे नाव कुठेच आले नाही.
आजच्या सुनावणीत तेजवानीच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद केला की, एफआयआरमधील एकही कलम तिला लागू होत नाही. सरकारी अधिकारी सोडून तेजवानीला का अटक केली? शीतलची अटक बेकायदेशीर असल्याच्या मुद्यावर तिच्या वकिलांनी दीड तास युक्तिवाद केला. या सुनावणीदरम्यान शीतल तेजवानीला चक्कर आल्याने वकिलांच्या विनंतीवरून तिला खुर्ची देण्यात आली.
सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलाचे सर्व युक्तिवाद खोडून काढले. 40 एकर जमीन सरकारची घेतली आहे त्याबाबत चौकशी करायची आहे. त्यासाठी कलम 35 नुसार तिला अटक केल्याचे त्यांनी सांगितले. तपास अधिकारी वाघमारे यांनी खुलासा केला की, ही जमीन केंद्र सरकारला बॉटनिकल ऑफ सर्व्हे या संस्थेला भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. तेजवानीने या जागेचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने केला आहे. यावर तेजवानीच्या वकिलांनी ती जमीन वतनदारांची असल्याचा युक्तिवाद केला.
पुणे पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये असे म्हटले की, मुंढवा येथील शासकीय जमीन बॉटनिकल सर्व्हेला भाडेपट्टीवर दिली आहे. ती जागा वतनदारांना परत केल्याचा (रिग्रँट) झाल्याचा कोणताही आदेश नव्हता. तरीही शीतलने त्यांची कुलमुख्त्यार पत्र घेऊन 2006 मध्ये ही जागा परस्पर विक्री केली. 2013 मधे या आरोपीने महसूल मंत्र्यांकडे रिग्रँटसाठी अपील केले. पण ते फेटाळण्यात आले. मग ती हायकोर्टात गेली. तिकडेही रिग्रँटसाठीचे अपील फेटाळण्यात आले. तरीही या आरोपीने रिग्रँट खोटे शासकीय ग्राऊंड तयार करण्यासाठी एक पत्र देऊन 11 हजारांचा डीडी भरला. पण तो कोणत्याही शासकीय बँक खात्यात जमा झालेला नाही.
या सुनावणीत मूळ वतनदारांचे वकील ॲड. अरुण सोनावणे यांनाही बाजू मांडली. सुनावणीनंतर त्यांनी सांगितले की, शीतलने वतनदारांनी दिलेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीचा गैरवापर केला. यातील अनेक वतनदार मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी राहतच नाही. शिवाय या सातबारावर मुंबई सरकारचा शिक्का आहे. शीतलने वतनदारांना तुमची जागा सोडवून देते असे म्हणून 2007 मध्ये कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. हे पेपर नंतर ड्राफ्टला जोडून पॉवर ऑफ ॲटर्नी तयार केली. पण ही पॉवर ऑफ ॲटर्नी जागा सोडवण्यासाठी होती, जमीन विकण्यासाठी नव्हती. परंतु शीतलने ती अमेडिया कंपनीला विकली. या खरेदीखताला जोडलेल्या पत्रावर पार्थ पवार यांची सही असलेले पत्र आहे. त्यामुळे तेही दोषी आहेत.
—————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
झारखंडमध्ये ‘विषारी वायू गळती’मुळे २ जणांचा मृत्यू, काही जण रुग्णालयात









