Kangana Ranaut Comment on Rahul Gandhi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यावरून देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे की, परदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिले जात नाही कारण सरकारला ‘असुरक्षित’ वाटते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार कंगना रणौत यांनी उपहासात्मक टीका करत त्यांना भाजपमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला आहे.
राहुल गांधींचा नेमका आरोप काय?
रशियाचे अध्यक्ष पुतिन भारतात येण्यापूर्वी राहुल गांधी यांनी संसदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला. ते म्हणाले, “जेव्हा कोणताही मोठा विदेशी पाहुणा भारतात येतो, तेव्हा विरोधी पक्षनेत्यांना भेटण्याची परंपरा राहिली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आणि मनमोहन सिंग यांच्या काळातही हेच प्रोटोकॉल पाळले जात होते. मात्र, आता मोदी सरकार प्रत्येक वेळी परराष्ट्र मंत्रालयामार्फत सूचना देऊन हे प्रोटोकॉल तोडत आहे. मला आजच्या डिनरसाठीही निमंत्रण देण्यात आलेले नाही.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “भारताचे प्रतिनिधित्व आम्हीही करतो, फक्त सरकारच नाही. हे सरकार विरोधी पक्षांना बाहेरील लोकांशी भेटू देत नाही, ही त्यांची असुरक्षितता आहे.”
कंगना रणौत यांचा उपरोधिक सल्ला
राहुल गांधी यांनी स्वतःची तुलना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी केल्यावर, भाजप खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्यावर पलटवार केला. कंगना म्हणाल्या, “हा निर्णय सरकारचा असतो की कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही. अटलजी देशभक्त होते आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान होता. मात्र, राहुल गांधींच्या देशाबद्दलच्या भावना नेहमीच प्रश्न निर्माण करणाऱ्या असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी करणे असो वा दंगल भडकवण्याची किंवा ‘तुकडे-तुकडे’ करण्याची भाषा असो, हे सर्व संशयास्पद आहे.”
याच संदर्भात कंगना रणौत यांनी राहुल गांधींना उपरोधिक सल्ला दिला: “जर राहुल गांधी स्वतःची तुलना अटलजींशी करत असतील, तर माझा त्यांना एकच सल्ला आहे की त्यांनी भाजपमध्ये सामील व्हावे. देवाने हे आयुष्य दिले आहे, तुम्हीही अटलजी बनू शकता.”
इतर विरोधी पक्षांची प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या आरोपाला समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी पाठिंबा दिला. त्या म्हणाल्या, “भाजपने अनेक परंपरा मोडल्या आहेत आणि ही त्याच साखळीतील एक नवी परंपरा आहे. यापूर्वी विदेशी नेते सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही भेटत असत.”
काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनीही ‘जे म्हटले आहे ते सत्य आहे’ असे सांगत सरकार संविधानविरोधी पद्धतीने काम करत असल्याची टीका केली. दुसरीकडे, भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी राहुल गांधींचे विधान ‘हास्यास्पद’ असल्याचे म्हटले आणि विरोधी पक्षनेत्यांनी या काळात सकारात्मक राहून पुतिन यांचे स्वागत करायला हवे, असे मत व्यक्त केले.
हे देखील वाचा – Digital 7/12 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता, ₹15 मध्ये उतारा मिळणार









