FIFA Peace Prize : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जागतिक स्तरावर शांतता आणि एकता वाढवण्याच्या प्रयत्नांसाठी FIFA (फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन) चा पहिला ‘शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. वॉशिंग्टनच्या केनेडी सेंटरमध्ये आयोजित 2026 फुटबॉल विश्वचषकाच्या ड्रॉ समारंभात ट्रम्प यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी जोरदार प्रचार केलेल्या ट्रम्प यांनी जगातील गाझा आणि युक्रेनसारख्या प्रमुख तणावग्रस्त क्षेत्रांमध्ये संवाद आणि तणाव कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत FIFA ने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. FIFA अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी ट्रम्प यांना पदक प्रदान केले आणि त्यांचे अभिनंदन केले.
ट्रम्प हे सातत्याने नोबेल शांतता पुरस्कार त्यांनाच मिळणार असा दावा करत होते. मात्र, नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला नाही. अखेर आता फिफाचा शांतता पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
पुरस्कार स्वीकारला आणि स्वतःचे कौतुक केले
पुरस्कार स्वीकारताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “हा माझ्या आयुष्यातील आणि त्यापलीकडील महान सन्मानांपैकी एक आहे.” ट्रम्प यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी अमेरिकेची स्थिती चांगली नव्हती, पण आता देश जगात सर्वात ‘हॉटेस्ट कंट्री’ आहे, असे सांगत त्यांनी या निमित्ताने स्वतःचे कौतुकही केले.
विवादास्पद दावे आणि भव्य सोहळा
पुरस्कारापूर्वी, ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला होता की, त्यांना पुरस्काराची गरज नाही, कारण त्यांनी त्यांच्या 10 महिन्यांच्या कार्यकाळात “8 युद्धे मिटवली” आहेत.
दरम्यान, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या यजमान देशांचे प्रमुख ड्रॉ समारंभासाठी उपस्थित होते, पण संपूर्ण कार्यक्रम ट्रम्प यांच्या आवडीनुसार आणि त्यांच्याभोवती फिरताना दिसला.
हे देखील वाचा – HMD Phone : HMD चे ‘पॉकेट फ्रेंडली’ फोन भारतात लाँच; किंमत फक्त 949 रुपयांपासून सुरू









