Belgaum News: कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला(Karnataka Winter session)आज बेळगावात (Belgaum News) सुरूवात झाली. यावेळी सीमाभागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी हक्कांसाठी महामेळावा आयोजित केला जातो. यंदा मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी होणार होते, परंतु संभाव्य विरोधाची भीती व्यक्त करत कर्नाटक सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारली. त्यानंतर आंदोलने रोखण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली.
या निर्णयाचा महाराष्ट्रातही निषेध व्यक्त होत आहे. उबाठा कार्यकर्त्यांनी कोल्हापूर एसटी स्टँड येथे कर्नाटक परिवहनच्या बस अडवून आंदोलन केले. मराठी जनतेच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनासाठी ८ ते १८ डिसेंबरदरम्यान बेळगावात मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. सुरक्षा, निवास व वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने ४.५ कोटी खर्चून उभारलेले नवे उद्यान आणि सजावटीचे कारंजे याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शहरातील हॉटेल आणि रिसॉर्टमधील सुमारे ३,५०० खोल्या आरक्षित केल्या आहेत. अधिवेशनादरम्यान ८ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









