Narendra modi- ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज संसदेत विशेष चर्चा करण्यात आली. मात्र, लोकसभेत वंदे मातरमवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi)यांनी पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरच वार केले. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांचे कौतुकही केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम या गीताचे महात्मा गांधी यांनी कौतुक केले, पण या गीताला मुस्लिमांनी विरोध करताच जवाहरलाल नेहरूंनी मुस्लिमांपुढे गुडघे टेकले आणि वंदे मातरमची मोडतोड केली. देशाचे तुकडे करतानाही हेच झाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी वंदे मातरम गीताचे कौतुक करीत ते राष्ट्रगीताच्या दर्जाचे आहे असे म्हटले होते. पण 15 ऑगस्ट 1937 रोजी महंमद अली जिना यांनी लखनौमधून वंदे मातरमच्या विरोधात नारा दिला, तेव्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले आसन डळमळीत होईल, अशी भीती वाटली. मुस्लीम लीगच्या तथ्यहीन आक्षेपांना नेहरूंनी जोरदार प्रत्युत्तर देणे अपेक्षित होते. वंदे मातरमच्या प्रति काँग्रेसची आणि आपली स्वतःची निष्ठा प्रगट करणे आवश्यक होते. पण झाले उलटेच. नेहरुंनी वंदे मातरमची पडताळणी करायला हवी असे म्हटले.
जिनांच्या विरोधानंतर पाच दिवसांनी नेहरूंनी 20 ऑक्टोबर रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी वंदे मातरममुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावू शकतात, असे म्हणत आपण जिनांच्या मतांशी सहमत असल्याचे स्पष्ट लिहिले. मुस्लीम समाज भडकेल, अशी भीतीही व्यक्त केली. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी कोलकाता येथेच काँग्रेसच्या अधिवेशनात वंदे मातरमच्या उपयुक्ततेवर चर्चा झाली. त्याच अधिवेशनात काँग्रेसने वंदे मातरमबाबत तडजोड केली. वंदे मातरमचे तुकडे करण्यास मान्यता दिली. नेहरू आणि काँग्रेसने गुडघे टेकले. त्याचा परिणाम होऊन पुढे देशाचे तुकडे करणेदेखील काँग्रेसला स्वीकारावे लागले.
वंदे मातरमचे महात्म्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये लिहिले. त्याला 1857 साली झालेल्या स्वातंत्र्यसमराची पार्श्वभूमी आहे. 1857 च्या स्वातंत्र्यसमरामुळे इंग्रज बिथरून गेले होते. भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले जात होते. भारताला आळशी, कामचुकार लोकांचा देश म्हटले जात होते. भारताची जमेल तेवढी नालस्ती इंग्रजांकडून केली जात होती. इंग्रजांचे ‘गॉड सेव्ह द क्वीन’ हे गीत भारतीयांच्या घराघरांत पोहोचवण्याचे षड्यंत्र रचले जात होते. अशा निराशात्मक वातावरणात बंकिमचंद्र यांनी ‘वंदे मातरम’ हे काव्य लिहिले. संपूर्ण जगात ‘वंदे मातरम’सारखे भावकाव्य कुठेही नाही. हे गीत संपूर्ण जगासाठी एक आश्चर्य बनून राहिले. गल्लीबोळात हे गीत स्वातंत्र्याचा नारा बनले. त्यामुळे बिथरलेल्या इंग्रजांनी ‘वंदे मातरम’वर कायद्याने बंदी आणली. ‘वंदे मातरम’चा उच्चार करणे, छापणे आणि अगदी हे दोन शब्द बोलणे हा देखील गंभीर गुन्हा ठरवला गेला. त्यावर कठोर शासन केले जाऊ लागले. ‘वंदे मातरम’ हे दोन शब्द देशाच्या स्वातंत्र्याचा मंत्र बनले होते. हे स्वातंत्र्य म्हणजे केवळ इंग्रज निघून जावेत आणि देशावर स्वदेशींची सत्ता यावी एवढ्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यापलीकडे जात भारताला स्वयंपूर्णतेचा मार्ग दाखवणारे दिशादर्शक होते.
स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे भावनात्मक नेतृत्व या महान गीताने केले. हे गीत म्हणजे हजारो वर्षांपासून तमाम भारतीयांच्या नसानसांमध्ये भिनलेले संस्कार, परंपरा आणि संस्कृती यांना उत्तम शब्दांत बांधून उत्तम भाव-भावनांमध्ये गुंफलेली मौल्यवान देणगी आहे. ज्याप्रमाणे एखाद्या नदीचा प्रवाह तिच्या संपूर्ण वाटचालीत भिन्न संस्कृतींशी जोडलेला असतो त्याचप्रमाणे ‘वंदे मातरम’ या गीतामध्ये भारतीय संस्कृती आणि राष्ट्रप्रेम ओतप्रोत भरलेले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 72 वर्षे आधी जर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले तर आम्ही सुध्दा या काळात ‘वंदे मातरम’ची कास धरून पुढील पंचवीस वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न निश्चित पाहू शकतो.
यानंतर पुन्हा काँग्रेसवर टीका करीत मोदी म्हणाले की, ‘वंदे मातरम’च्या दीडशे वर्षांच्या वाटचालीत काही निराशाजनक टप्पेही आले होते. वंदे मातरमला जेव्हा पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता. या गीताला जेव्हा शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा आपल्याच सत्ताधार्यांनी देशावर आणीबाणी लादून देशाच्या संविधानाची हत्या केली. देशासाठी तो एक काळाकुट्ट कालखंड होता. देशभक्तीवर बोलणार्यांना गजाआड केले जात होते. संपूर्ण देश आणीबाणीच्या साखळदंडांमध्ये जखडला गेला होता. त्या काळ्या कालखंडातून बाहेर पडण्याची प्रेरणा ‘वंदे मातरम’ या गीताने दिली. ‘वंदे मातरम’शी जोडलेली ही काळी कुट्ट पार्श्वभूमी आजच्या युवकांना माहिती व्हावी म्हणून त्याचे स्मरण करून द्यावे लागत आहे. गेल्या शतकात वंदे एवढे आघात का झाले, वंदे मातरमचा विश्वासघात का केला गेला, ती कोणती शक्ती होती की, जी महात्मा गांधी यांच्या भावनेवर भारी पडली. याची जाणीव आजच्या पिढीला करून देणे आमचे कर्तव्य ठरते.
‘वंदे मातरम’वरील पंतप्रधानांच्या टीकेला काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणात जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय गीत म्हणून ‘वंदे मातरम’ या पूर्ण गीतामधील पहिली दोन कडवी घेण्याचा ठराव ज्या अधिवेशनात मंजूर झाला त्या अधिवेशनात गुरू रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि तत्कालीन जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आदि थोर राष्ट्रपुरुष हजर होते. त्यांच्यापैकी एकानेही या प्रस्तावाला विरोध केला नाही. वंदे मातरमचे तुकडे एका विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेसने केले असे म्हणून मोदींनी त्या सर्व राष्ट्रपुरुषांचा अपमान केला आहे.
आपल्या भाषणातून प्रियंका गांधी यांनी मोदी आणि तमाम भाजपावाल्यांना उद्देशून एक आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जेवढे आरोप करायचे असतील, त्यांनी केलेल्या जेवढ्या चुका दाखवायच्या असतील त्याची एक यादी तयार करा. संसदेत जशी ‘वंदे मातरम’वर दहा तास चर्चा घेतली तशीच दहा, वीस, तीस किंवा चाळीस तास त्या यादीवर चर्चा घ्या. मात्र त्यानंतर नेहरू हा विषय कायमचा बंद करा. त्यानंतर या सदनात चर्चा बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई, महिलांवरील अत्याचार आदि सर्वसामान्य जनतेला छळणार्या मुद्यांवर होऊ द्या. जनतेने ज्या कारणांसाठी आपल्या सर्वांना या सदनात निवडून पाठवले त्या विषयांवर चर्चा करू. जनतेच्या कामासाठी असलेला वेळ नेहरूनंतर आरोप आणि टीका करण्यात वाया घालवू नका.
त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधार्यांनी गदारोळ केला. या गदारोळात प्रियंका गांधी यांनी म्हटले की, स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेल्यावर आता ‘वंदे मातरम’वर चर्चा करण्याची मुळीच आवश्यकता नाही. देशवासीयांचा आत्मा असलेल्या वंदे मातरम’ वर चर्चा करणे हे सरकारचे पाप आहे. काँग्रेस या पापात सामील होणार नाही. बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या विषयांवरून देशवासीयांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चर्चेचा घाट घातला गेला आहे, असे खडसावून सांगितले. महाराष्ट्रात विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेतील ‘वंदे मातरम’वरील चर्चेबद्दल बोलताना सांगितले की, आज आम्ही विधिमंडळात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गाऊन या गीताला नमन केले. ‘वंदे मातरम’ हा स्वातंत्र्याचा मंत्र आहे. भाजपाच्या काळात ‘वंदे मातरम’चा नेहमीच आदर, सन्मान करण्यात आला. सर्वसामान्यांना स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडणारा हा मंत्र आहे. विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात आम्ही ‘वंदे मातरम’वर चर्चा घेऊ.
——————————————————————————————————————————————————हे देखील वाचा –









