Leopard Attack : महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले वाढत आहेत. शिकारीच्या शोधात बिबटे जंगलाबाहेर मानवी वस्तीत शिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महायुती सरकारने एक अनोखा उपाय सुचवला आहे. बिबट्यांनी जंगलाबाहेर येऊ नये, यासाठी जंगलातच मोठ्या प्रमाणात शेळ्या आणि बकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंबंधी माहिती दिली.
उपाययोजना आणि कारणमीमांसा
नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत हल्ल्यांमध्ये सुमारे 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वनमंत्र्यांच्या मते, हिंस्त्र प्राण्यांना भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेले नाही, त्यामुळे ते मानवी वस्तीकडे वळत आहेत.
गणेश नाईक यांनी विधानसभेत महत्त्वाचे विधान केले:
“बिबट्यांच्या हल्ल्यात चार माणसांचा मृत्यू झाला, तर 1 कोटी रुपये भरपाई द्यावी लागते. मृत्यूनंतर भरपाई देण्याऐवजी, 1 कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडा, जेणेकरून बिबटे गावात येणार नाहीत.” जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यात बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या सोडण्याची सुरुवातही वनखात्याने केली आहे.
इतर कायदेशीर आणि प्रशासकीय उपाय
बिबट्या हा सध्या शेड्यूल 1 मध्ये येणारा प्राणी आहे. आता त्याचा समावेश शेड्यूल 2 मध्ये करण्यात यावा, यासाठी केंद्रीय वनखात्याला प्रस्ताव पाठवला आहे. बिबटे आता जंगलात नसून उसाच्या फडात पैदास करत आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.
बिबट्यांना पकडण्यासाठी मागणी असलेल्या ठिकाणी तातडीने पिंजरे उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बिबट्यांची काही प्रमाणात नसबंदी करण्याची परवानगीही केंद्रीय वनखात्याकडून राज्य सरकारला मिळाली आहे.
राज्यातील बिबट्यांची संख्या जास्त असलेल्या भागातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याबद्दलही विचारणा करण्यात आली आहे. वन विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार राज्यात 2,285 बिबटे आहेत, तर सदस्यांच्या मते ही संख्या 5,000 पेक्षा जास्त असू शकते.
हे देखील वाचा – Mehul Choksi Extradition : मेहुल चोक्सीला मोठा झटका! बेल्जियमच्या न्यायालयाने प्रत्यार्पणाचा मार्ग केला मोकळा; आता भारतात येणार?









