Bombay High Court Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठांसाठी) लिपिक, शिपाई, लघुलेखक आणि वाहनचालक यासह विविध पदांसाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीमध्ये एकूण 2381 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 7वी पास ते पदवीधर उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा आणि नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाण मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये एकूण 2381 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये लिपिक (1382 पदे), शिपाई/ हमाल (887 पदे), लघुलेखक निम्न श्रेणी (56 पदे), लघुलेखक उच्च श्रेणी (19 पदे) आणि वाहनचालक (37 पदे) यांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, शिपाई पदासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणे आणि मराठी वाचता-लिहिता येणे आवश्यक आहे. वाहनचालक पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे, एलएमव्ही परवाना आणि 3 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. लिपिक आणि लघुलेखक पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक असून, इंग्रजी टायपिंगचा 40 शब्द प्रति मिनिट (WPM) वेग आणि शॉर्टहँडची आवश्यक गती (80 WPM किंवा 100 WPM) असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया
उमेदवारांचे वय 08 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (स्क्रीनिंग टेस्ट), कौशल्य चाचणी (टायपिंग/शॉर्टहँड) आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारावर केली जाईल.
वेतन (पगार) तपशील
निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार उत्कृष्ट वेतन मिळेल. लघुलेखक (उच्च श्रेणी) साठी ₹56100/- ते ₹177500/-, लघुलेखक (निम्न श्रेणी) साठी ₹49100/- ते ₹155800/- आणि लिपिक व वाहनचालक पदांसाठी ₹29200/- ते ₹92300/- प्रति महिना पगार मिळेल. शिपाई/हमाल पदासाठी ₹16600/- ते ₹52400/- वेतन निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळ bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. होम पेजवरील करिअर लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी आणि आवश्यक तपशील भरून कागदपत्रे अपलोड करावीत. फॉर्म सादर केल्यावर त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवणे उपयोगी ठरेल. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे.
हे देखील वाचा – Royal Enfield Classic 350 ला टक्कर देते ‘ही’ शानदार बाईक; किंमत 15 हजारांनी झाली कमी; पाहा डिटेल्स









