Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या परखड मतांसाठी कायमच ओळखले जातात. त्यात आता त्यांचं एक वक्तव्य जोरदार वाजताना दिसत आहे. पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्याचे धक्कादायक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. पाकसोबत युद्ध करणे सरकारची घोडचूक ठरली असल्याचे देखील ते म्हणले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करत गंभीर स्वरूपाचे दावे केले आहेत. आपली अर्थव्यवस्था पाकच्या अर्थव्यवस्थेहून १० पट अधिक मोठी आहे. पण त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकसोबतचे युद्ध थांबवण्याचा निर्णय का घेतला? हे मला अजूनही कळत नाही. यामुळे युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला. मोदींवर कसला दबाव आहे त्याचे उत्तर आपण सर्वानी शोधले पाहिजे. मोदींवर अमेरिकेचा दबाव आहे का? परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही आपण मागे आहोत, असे थेट सवाल त्यांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे पक्षाचा पराभव झाला असल्याचा दावा देखील केला आहे. मागील वर्षभरात राज्याच्या राजकारणात बरेच उलट फेर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत आम्हाला अतिआत्मविश्वासाचा फटका बसला. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून उतावीळ झाले होते, अश्या परखड शब्दात त्यांनी काँग्रेसच्याच नेत्यांचे कान टोचले.
ते पुढे म्हणतात, सध्या राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. भाजपने ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला. आम्ही आमच्या पराभूत उमेदवारांना याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मी स्वतःसुद्धा याचिका दाखल केली असल्याचे देखील ते म्हणाले. त्यावर सुनावणी देखील सुरू आहे. माझ्याही मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाली असल्याचे ते म्हणाले.
हे देखील वाचा – Statue Of Liberty : वाऱ्याच्या तीव्रतेमुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही क्षणातच कोसळली; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल









