UBT–MNS Alliance Announcement – उबाठा-मनसे युतीची दोन दिवसांत घोषणा राज ठाकरेंच्या निवासस्थानी चर्चा! बैठका सुरू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर दोघांमध्ये अनेकदा भेटीगाठी होऊनही अद्याप उबाठा-मनसेत युतीची घोषणा झालेली नाही.
मात्र, महापालिका निवडणुका जाहीर होताच आज उबाठा आणि मनसे यांच्यात जागावाटपाची बोलणी वेगाने सुरू झाली. उबाठाचे संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या बैठकीत मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकरही उपस्थित होते.
बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी उबाठा-मनसे युतीची घोषणा एक-दोन दिवसांत होईल, असे सांगितले.
आज सकाळी पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत यांनी मुंबईसह पाच प्रमुख महानगरपालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवणार आहेत, असे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, मुंबई महापालिकेची निवडणूक हा मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि मराठा माणसाच्या अस्तित्वाचा लढा आहे. शिवसेना स्थापनेपासून मराठी माणसासाठी लढत आली आहे. मुंबईवरील मराठी माणसाचा ठसा पुसला जाऊ नये आणि मुंबईचा महापौर मराठी माणूसच झाला पाहिजे यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.
जागावाटपाचे सूत्र याच आठवड्यात निश्चित होईल व युतीची घोषणा होईल.या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच संजय राऊत आणि उबाठा आमदार अनिल परब हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेले.
सुमारे तासभर ही बैठक चालली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी नेमकी काय चर्चा झाली हे सांगण्यास नकार दिला. मात्र अंतिम निर्णय अधिकृतपणे लवकरच जाहीर केला जाईल,असे परब यांनी सांगितले. ते म्हणाले की, युतीची अधिकृत घोषणा केव्हा करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवतील.
त्याची तारीख लवकरच कळवली जाईल. सद्यस्थितीत सर्व गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती शेवटचा निर्णय होईल. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल. कोणता पक्ष आमच्यासोबत असेल किंवा आमची कुणासोबत चर्चा सुरू आहे याविषयी मी आत्ताच काही सांगू शकत नाही. एकदा यासंबंधीच्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळाले की आम्ही त्याविषयी कळवू. त्यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही.
आजच्या बैठकीला उपस्थित असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आज आमची बैठक झाली. काही गोष्टी ठरल्या आहेत. आम्ही पुन्हा एक बैठक घेणार आहोत. त्यानंतर एक-दोन दिवसांत युतीची घोषणा होईल. शिवतिर्थावरील बैठकीनंतर जागावाटपाची जबाबदारी असलेल्या दोन्ही पक्षांचे नेते अनिल परब, बाळा नांदगावकर आणि संजय राऊत यांची पुन्हा बैठक झाली. त्यानंतर उबाठा-मनसेच्या जागावाटपाची घोषणा 18 डिसेंबर रोजी करण्यात येईल, अशी माहिती उबाठा-मनसेच्या सूत्रांकडून सांगितली जात आहे.
मनसे सोबत नकोच स्थानिक काँग्रेस ठाम
मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्याबाबत अनिल परब यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, काँग्रेसच्या बाबतीत मी आत्ता आपल्याला काहीच सांगू इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना अंतिम स्वरूप आले की आम्ही कळवू.
चर्चेतील तपशील सांगितले जात नाहीत. निर्णय सांगितला जातो. आम्ही आजही महाविकास आघाडीत आहोत आणि आमचा शेवटपर्यंत असाच प्रयत्न राहणार आहे की महाविकास आघाडी एकत्र राहावी. आता यात काँग्रेस काय निर्णय घेते, हा त्यांचा प्रश्न आहे. इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो.
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करायची की नाही, याबाबत आमचे नेते निर्णय घेतील. तर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील निवडणुकांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांवर सोपवले आहेत. मात्र राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना राज ठाकरेंची मनसे सोबत नको. मारहाण करणार्या,शिवीगाळ करणार्या पक्षासोबत कसे जाणार,असे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी वारंवार म्हटले आहे.
आज वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल असे जाहीर केले. मविआतील तिसरा पक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसेला सोबत घेण्यास तयार आहे. परंतु त्या पक्षाची मुंबईत फारशी ताकद नाही, असे संजय राऊत यांनीच म्हटले आहे.
हे देखील वाचा –
मुंबईसाठी आदित्य ठाकरेंचा महा एल्गार; निवडणुकांच्या घोषणानंतर आदित्य ठाकरेंची मुंबईत पहिली सभा..
भारताचा पाकविरोधात पहिल्याच दिवशी पराभव? पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर दावा..









