RBI Restrictions on Nashik Bank : देशातील बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लोकनेते आर. डी. (अप्पा) क्षीरसागर सहकारी बँक लिमिटेड या बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत. बँकेच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्याने आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने 15 डिसेंबर 2025 रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले असून 16 डिसेंबर 2025 पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी हे निर्बंध कायम राहतील.
बँकेच्या कामकाजावर आले मर्यादा
आरबीआयच्या नवीन आदेशानुसार, आता या बँकेला रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणतेही नवीन कर्ज देता येणार नाही. तसेच बँकेला कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक करण्यास किंवा नवीन ठेवी स्वीकारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, बँकेला आपली कोणतीही मालमत्ता विकता येणार नाही किंवा त्याचे हस्तांतरण करता येणार नाही.
बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, ठेवीदारांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, ज्या ग्राहकांच्या ठेवी आहेत, त्यांना त्यांचे कर्ज सेटल करण्याची मुभा देण्यात आली आहे.
बँकेला दैनंदिन अत्यावश्यक खर्चासाठी काही प्रमाणात सवलत दिली आहे. यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल आणि कार्यालयाचे भाडे भरण्यासाठी निधी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. बँकेने हा आदेश आपल्या संकेतस्थळावर आणि कार्यालयात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण
बँकेवर निर्बंध आल्यामुळे खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, त्यांच्या पैशांना विमा संरक्षण उपलब्ध आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमांनुसार, पात्र ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळते. त्यामुळे ज्यांच्या ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत आहेत, त्यांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी डीआयसीजीसीकडे दावा करता येईल. या प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आरबीआयने बँकेचा परवाना अद्याप रद्द केलेला नाही. हे केवळ तात्पुरते निर्बंध असून बँक प्रशासनाच्या आर्थिक सुधारणेचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवरही नुकतेच 9 डिसेंबरपासून निर्बंध लादले गेले होते, त्यानंतर आता ही दुसरी मोठी कारवाई समोर आली आहे.
हे देखील वाचा – Anjali Damania: … तर फडणवीसांना कधीही माफ करणार नाही; अंजली दमानिया यांचा कडाडून विरोध








