Rohit Pawar on Sanjay Shirsat : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घडामोडीवर अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली असून, महायुतीमधील आणखी एका मंत्र्यावर निशाणा साधला आहे.
कोकाटे यांचा राजीनामा हा नैतिकतेतून नव्हे, तर नाईलाजातून आल्याचे म्हणत रोहित पवारांनी आता मंत्री संजय शिरसाट यांच्या ‘विकेट’ची वाट पाहत असल्याचे सूचक विधान केले आहे.
निसटण्याचे मार्ग संपल्याने राजीनामा – रोहित पवार
माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, कोकाटे यांचा हा निर्णय स्वेच्छेने घेतलेला नाही. जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती, तेव्हाच त्यांनी नैतिकतेच्या आधारावर पायउतार व्हायला हवे होते. मात्र, आता जेव्हा निसटण्याचे सगळे कायदेशीर मार्ग बंद झाले, तेव्हा कुठे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सरकारनेही त्यांचा राजीनामा आधीच घेऊन आपण खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहोत हे सिद्ध करायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे…!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’…
संजय शिरसाट यांच्यावर रोख
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केवळ कोकाटेंवर टीका करून थांबले नाहीत, तर त्यांनी पुढचा निशाणा मंत्री संजय शिरसाट यांच्यावर साधला आहे. “या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, हीच अपेक्षा! आम्ही मात्र आता मंत्री संजय शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत,” असे रोहित पवारांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, विरोधक आता शिरसाट यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कायद्याच्या सन्मानाचा मुद्दा
रोहित पवार यांनी सरकारला कायद्याच्या सन्मानाची आठवण करून दिली. जर वेळीच कारवाई झाली असती, तर ‘कायदा आणि न्याय सर्वांसाठी समान आहे’ असा चांगला संदेश समाजात गेला असता, असे त्यांनी नमूद केले. माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले असून, कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या ‘विकेट’च्या मुद्द्यामुळे सत्ताधारी गोटात काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हे देखील वाचा – Ram Sutar : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार यांचे निधन; वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास








