Marathi School : मुंबईत मराठीचा मुद्दा कायमच चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते देखील बऱ्याचदा या विषयावर बोलताना दिसतात. मराठी शाळांवर अनेकदा राजकारण तापलेले देखील पाहायला मिळाल आहे. आत अशातच मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची होणारी गळचेपी थांबावी याचबरोबर ठरवून बंद पाडत असलेल्या मराठी शाळा वाचवाव्यात यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. परंतु या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतरही मराठी अभ्यास केंद्र मोर्चा काढण्यावर ठाम राहिले आणि सकाळी जवळपास १०:३० वाजताच्या सुमारास हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून पालिका मुख्यालय दिशेने मोर्चा काढण्यात आला.
मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने रविवारी दादरच्या राजर्षी शाहू सभागृह येथे ‘ठरवून बंद पाडलेल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ घेण्यात आली. या परिषदेत १८ डिसेंबर रोजी महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अभ्यास केंद्राच्या वतीने मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिस ठाणे आणि आझाद मैदान पोलिस ठाणे यांच्याकडे अर्ज केला होता; परंतु, पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम १६८चा आधार घेवून दोन्ही ठिकाणी मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे सांगितले. तसेच परवानगी नसताना मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अश्या आदेशाचे पत्र मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि सचिव आनंद भंडारे यांना पाठवण्यात आले होते.

या मोर्चाला सर्वपक्षीय राजकीय वर्ग विविध शैक्षणिक संस्था, संस्थाचालक संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असल्यामुळे मनपा आयुक्तांची भेट होईपर्यंत या आंदोलकांनी हुतात्मा चौकातच ठिय्या आंदोलन सुरु केलं असल्याची माहिती आहे. या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर हुतात्मा चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी राजकीय पक्षांसह महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मराठी एकीकरण समिती, मुंबई मराठी अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अन्याय निवारण सेवा संघ आदी विविध शैक्षणिक संघानी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.
हे देखील वाचा – Supriya Sule on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध; धनंजय मुंडे अमित शहा भेटीवर सुप्रिया सुळेंची टीका..








