Sushma Andhare on Eknath Shinde : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भावाच्या (Prakash Shinde) रिसॉर्टमध्ये १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काल केला. मात्र साताऱ्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सावरीत या गावातील एका रिसॉर्टमध्ये टाकलेल्या धाडीत तब्ब्ल ४५ किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे (Prakash Shinde) चालवत असल्याचा आरोप देखील होत आहे.
त्यानंतर आज पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. याचबरोबर सुषमा अंधारेंचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा प्रकाश शिंदे यांनी केला असून त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते, तर ते हॉटेल आपण चालवत नाही, दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे, अशी माहिती देखील प्रकाश शिंदें यांनी दिली, त्यानंतर आज अंधारेंनी ते हॉटेल प्रकाश शिंदेंचं आहे आणि तेच ते हॉटेल चालवत असल्याचे पुरावे देखील माध्यमांसमोर दाखवले आहेत.(Prakash Shinde)
आज पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी अनेक खुलासे केले. पत्रकार परिषदेत आपल्या फोनवरून प्रात्यक्षिक दाखवत अंधारे म्हणाल्या, जर ही जागा कमर्शियल नसेल तर त्याला रेटिंग कशी काय असू शकते, याला ४.८ इतकं रेटिंग आहे, गुगल (google) वरती डायरेक्शन देखील आहे आणि व्हॉट्सॲप नंबर देखील दिलेला आहे, इथे ऑनलाईन बुकिंगही करता येते,याशिवाय हॉटेलचा मॅपही दाखवण्यात आलेला आहे, तिथे दिलेल्या नंबर वर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये प्रकाश शिंदे असं नाव इथे आलं, पुढे त्या म्हणतात हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदेच चालवतात कारण इथे त्यांचा नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचं नाव आलेलं आहे असे पुरावे देखील त्यांनी माध्यमांसमोर मांडले.
पुढे त्या बोलतात माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही, मी लॉजिकल बोलते आहे, आमच्या महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का, आणि असा ड्रग्स मधून कमवलेला पैसा तुम्ही निवडणुकीत वापरता, मग तर २२ हजाराला एक मत तर फार सोपी गोष्ट आहे, २२ काय तर २५ हजाराला देखील तुम्ही मत घेऊ शकता, अशी घणाघाती टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली.
त्याचबरोबर यावेळी सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा राजीनामा मागत आहे. वाल्मिक कराड प्रकरणी मुंडे यांचा राजीनामा घेतला, तर मग इथे तर प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेंचे भाऊ आहेत. मग उपमुख्यमंत्री असल्यामुळे तपासाला आपले पद प्रभावित करू शकतं असं वाटत असेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारेंनी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या निर्णायक वळणार जाणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.








