Pandharpur News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी करून अहवाल देखील दिला आहे. याबाबत शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिल्यावर विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप होणार असल्याचे समोर आले आहे. या आधी ही पांडूरंगाच्या चरणांची झीज झाली होती. त्यावेळी देखील वज्रलेप लावण्यात आला होता. यावेळी ही हीच प्रक्रीया पार पडणार असल्याची माहिती आहे.
पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही स्वयंभू असल्याचे मानले जाते. याच विठ्ठल मूर्तीच्या चरणांची सध्या झीज होत असल्याचे समोर येत आहे. भारतातील एकमेव असे तीर्थक्षेत्र आणि देवता म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते आणि तिथे स्पर्श दर्शन देखील होते. त्यामुळेच विठ्ठलाच्या चरणांची झीज होत असल्याचे म्हटले जाते. याबाबत काही महिन्यांपूर्वी पुरातत्व विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी विठ्ठल मूर्तीची सखोल पाहणी देखील केली. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती अर्थात मंदिर प्रशासनास तसा अहवाल देखील दिला होता. हा अहवाल पुरातत्व विभागाकडून सादर करण्यात आला.
पुरातत्त्व विभागाने दिलेला अहवाल मंदिर समितीने शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे मार्गदर्शनासाठी आणि परवानगीसाठी सादर करण्यात आला आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या परवानगी नंतरच विठ्ठल मूर्तीवर वज्रलेप करण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून बोलले जात आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर कोरोना काळात सन २३ आणि २४ जुलै २०२० रोजी मूर्ती जतन आणि संवर्धनासाठी लेपन करण्यात आले होते. विठ्ठलाच्या मूर्तीवर सर्वप्रथम १९८८ साळी लेपण झाले. यानंतर २००५, २०१२आणि २०२० साली वज्रलेप करण्यात आला होता. यास वज्रलेपला एपॉक्सी लेप असे देखील म्हटले जाते.









