Home / मनोरंजन / ED : सोनू सूद, युवराज सिंगसह अनेक सेलिब्रिटींना ईडीचा दणका! कोट्यवधींची मालमत्ता जप्त; काय आहे प्रकरण?

ED : सोनू सूद, युवराज सिंगसह अनेक सेलिब्रिटींना ईडीचा दणका! कोट्यवधींची मालमत्ता जप्त; काय आहे प्रकरण?

ED action on celebrities 1xBet : ऑनलाइन सट्टेबाजीच्या बेकायदेशीर व्यवसायावर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बॉलीवूड अभिनेत्री...

By: Team Navakal
ED action on celebrities 1xBet
Social + WhatsApp CTA

ED action on celebrities 1xBet : ऑनलाइन सट्टेबाजीच्या बेकायदेशीर व्यवसायावर अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, नेहा शर्मा, मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटींची 7.93 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ही कारवाई करण्यात आली असून यामुळे मनोरंजन आणि क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

काय आहे 1xBet प्रकरण?

परदेशातून चालवल्या जाणाऱ्या ‘1xBet’ या बेकायदेशीर सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या विरोधात विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारींच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. तपासात असे समोर आले की, 1xBet आणि त्याच्याशी संबंधित 1xBat व 1xbat Sporting Lines या ब्रँड्सनी भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराचा प्रसार केला होता. या व्यासपीठांना भारतात काम करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती.

सेलिब्रिटींवर कारवाईचे कारण

तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, या सेलिब्रिटींनी परदेशी कंपन्यांशी करार करून सोशल मीडिया, व्हिडिओ आणि जाहिरातींच्या माध्यमातून या सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचा प्रचार केला होता. जाहिरातींचे मानधन परदेशी मध्यस्थांमार्फत आणि गुंतागुंतीच्या व्यवहारांद्वारे पाठवण्यात आले होते, जेणेकरून पैशांचा मूळ स्रोत लपवता येईल. ईडीने हा पैसा गुन्हेगारीतून कमावलेला असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

यापूर्वीची कारवाई आणि सक्त ताकीद

विशेष म्हणजे या प्रकरणात कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 6 ऑक्टोबर 2025 रोजी ईडीने क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आता सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना कडक इशारा दिला आहे. बेकायदेशीर सट्टेबाजी किंवा जुगाराच्या प्लॅटफॉर्मची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाहिरात करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे यंत्रणेने स्पष्ट केले आहे. अशा प्लॅटफॉर्ममुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो आणि त्यांचा वापर मनी लाँड्रिंगसाठी केला जातो, असेही ईडीने नमूद केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या