Shubman Gill : बीसीसीआयने २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघनिवडीत सर्वात मोठा धक्का म्हणजे सलामीवीर शुबमन गिल याला डच्चू देण्यात आला आहे. गिलच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी गिलला संघात स्थान न मिळाल्याने उघडपणे नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले आहे.
गावस्करांना बसला मोठा धक्का
संघाची चर्चा सुरू असताना गावस्कर यांनी थेटपणे सांगितले की, गिलची निवड न होणे ही केवळ आश्चर्याची गोष्ट नसून तो एक मोठा धक्का आहे. गावस्कर म्हणाले की, “शुबमन गिल हा एक जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. गेल्या काही सामन्यांत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची बॅट शांत राहिली असली, तरी त्याचा दर्जा नाकारता येणार नाही. फॉर्म हा तात्पुरता असतो, पण खेळाडूचा क्लास कायम असतो.”
गिल बऱ्याच काळानंतर मैदानात परतला होता, त्यामुळे टी२० सारख्या वेगवान फॉरमॅटमध्ये लय पकडणे त्याला कठीण गेल्याचेही गावस्करांनी नमूद केले.
‘घरच्यांना सांगून नजर उतरवून घे’
सुनील गावस्कर यांनी गिलसोबतच्या एका खास प्रवासाचा किस्साही शेअर केला. अहमदाबादहून परतताना गावस्कर, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव एकाच विमानात होते. यावेळी गावस्कर यांनी गिलला एक वडीलकीचा सल्ला दिला.
गावस्कर म्हणाले की, “शुबमनला गेल्या काही काळात मान आणि गुडघ्याला झालेल्या दुखापती विचित्र होत्या. मी त्याला गमतीने पण मनापासून सांगितले की, घरामध्ये कोणाला तरी सांगून तुझी ‘नजर’ उतरवून घे. आपण भारतीय संस्कृतीत मानतो की कधी कधी कोणाची तरी नजर लागते, म्हणून मी त्याला हा सल्ला दिला.”
टी२० मधील गिलची फलंदाजी
गावस्करांच्या मते, शुबमन गिल हा नैसर्गिकरित्या कसोटी क्रिकेटचा खेळाडू आहे. तो जमिनीलगत शॉट्स खेळण्याला प्राधान्य देतो. टी२० मध्ये जेव्हा तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळायचे असते, तेव्हा गिलच्या नैसर्गिक शैलीत काही अडचणी येऊ शकतात. मात्र, आयपीएलमध्ये गिलने स्वतःला सिद्ध केले आहे, त्यामुळे टी२० फॉरमॅट त्याच्यासाठी नवीन नाही.
आता विश्वचषकाच्या संघातून बाहेर पडल्यानंतर गिलला पुन्हा एकदा शून्यापासून तयारी करावी लागणार आहे. अक्षर पटेलची उपकर्णधारपदी झालेली नियुक्ती हा देखील या संघनिवडीतील एक महत्त्वाचा बदल ठरला आहे.









