Jejuri Fire : पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या उत्साहावर एका दुर्दैवी घटनेमुळे विरजण पडले आहे. गडाच्या पायथ्याशी विजयी मिरवणूक सुरू असताना भंडाऱ्याच्या उधळणीत अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या भीषण आगीत नवनिर्वाचित नगरसेविकांसह एकूण 16 जण होरपळले आहेत.
नेमका कसा उडाला आगीचा भडका?
जेजुरी नगरपरिषदेवर यंदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. या विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याशी ‘येळकोट येळकोट’च्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण सुरू केली होती. मिरवणूक महाद्वार रोडवर आली असता, विजयी उमेदवारांचे औक्षण केले जात होते. यावेळी आरतीच्या ताटातील दिव्याची ज्योत किंवा फटाक्यांच्या ठिणगीचा हवेत उधळलेल्या भंडाऱ्याशी संपर्क आला आणि क्षणात आगीचा मोठा लोळ उठला. भंडाऱ्यात रासायनिक भेसळ असल्याने हा भडका उडाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे जेजुरी ब्रेक
— ✧ 𝕾𝖍𝖚𝖇𝖍𝖆𝖒 ✧ (@shubham_pb) December 21, 2025
विजय जल्लोषमिरवणुकीवेळी लागली मोठी आग
जेजुरी गडाच्या कमानीजवळ केला जात होती भंडाराची उधळण
यावेळेस कापूर जळत असताना भंडारा पडल्याने झाला मोठा स्फोट
यामध्ये राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक भाजले असल्याची माहिती
तसेच इतर 18 जण देखील भाजले असल्याची प्राथमिक माहिती pic.twitter.com/8vWkZs5O4H
नगरसेविकांसह 16 जण जखमी
या आगीच्या दुर्घटनेत नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे आणि स्वरूपा जालिंदर खोमणे यांच्यासह राहुल घाडगे, उमेश भंडलकर, रुपाली खोमणे आणि विलास बारभाई असे एकूण 16 जण भाजले आहेत. जखमींना तातडीने जेजुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सुदैवाने, बहुतेकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत प्रशासनाकडे भेसळयुक्त भंडारा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जेजुरीत अजित पवारांची सरशी
राजकीय आघाडीवर जेजुरीमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची सत्ता खालसा करत अजित पवारांनी इथे बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 10 नगरपरिषदांवर अजित पवार गटाने वर्चस्व मिळवत ग्रामीण भागावर आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, विजयाचा हा गुलाल उधळत असताना झालेल्या आगीच्या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा – मारुतीची ‘ही’ कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लागली रांग; Wagon R आणि Baleno ला टाकले मागे









