Baramati Election Results : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य असल्याचे सिद्ध केले आहे. काका-पुतण्याच्या या हायव्होल्टेज लढतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ पैकी ३५ जागांवर झेंडा फडकवत एकहाती सत्ता काबीज केली आहे.
या निकालामुळे शरद पवार गटाच्या परिवर्तनाच्या दाव्यांना मोठा धक्का बसला असून, बारामतीत अजूनही अजित पवारांचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पवारांच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांची ‘पॉवर’
नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४१ जागांपैकी ८ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ३३ जागांसाठी झालेल्या मतदानात अजित पवार गटाने आपली घोडदौड कायम ठेवली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह एकूण ३५ जागांवर अजित पवारांच्या शिलेदारांनी विजय मिळवला.
दुसरीकडे, युगेंद्र पवार यांनी प्रचारात दिलेला ‘१०० टक्के परिवर्तनाचा’ नारा मतदारांनी नाकारल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार गटाला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला बारामतीत खातेही उघडता आलेले नाही.
विरोधी पक्षांची अनपेक्षित ‘एन्ट्री’
अजित पवारांचे वर्चस्व असले तरी, यंदा काही जागांवर झालेल्या पराभवाने अंतर्गत नाराजी समोर आणली आहे. २०१७ च्या तुलनेत यंदा विरोधी नगरसेवकांची संख्या ४ वरून ६ वर पोहोचली आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष (रासप), बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि शरद पवार गटाने प्रत्येकी १ जागा जिंकत नगरपालिकेत प्रवेश केला आहे. तसेच ३ अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत. अजित पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांचा झालेला पराभव हा धक्कादायक मानला जात आहे.
पुणे जिल्ह्यातही ‘दादा’ ठरले किंग
केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात अजित पवारांनी आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. जिल्ह्यातील १७ नगरपालिकांपैकी १० ठिकाणी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर आणि जेजुरी यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. “जिल्हा कोणाच्या मागे आहे, हे आता निकालावरून स्पष्ट झाले आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी विजयानंतर दिली आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याचा विचार करता भारतीय जनता पक्ष १२४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे.
हे देखील वाचा – Electric Cars: डिझेल-पेट्रोलचे टेन्शन सोडा! 7 लाखांच्या बजेटमध्ये घरी न्या इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 3 स्वस्त पर्याय









