MNS Shivsena Alliance : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाल्याचे आपण पाहिले. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांप्रमाणे मैदानात उतरले नसल्यचे चित्र आपल्या डोळ्यापुढे आहेच. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फारसे यश मिळालेली नाही. परंतु, राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
त्यापैकी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई असल्याचे देखील बोलले जाते. त्यात उद्यावर उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आली तरी ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेच्या जागावाटपाचा तिढा काही सुटला नसल्याच्या बातम्या होत्या मात्र आता राज्याचं लक्ष लागून असलेल्या ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती आता समोर येत आहे.
शिवडीनंतर महत्त्वाच्या असलेल्या दादरच्या जागावाटपाचा तिढा देखील सुटला आहे. दादरमधील ज्या दोन वॉर्डवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेस सुरू होती त्यावर आता एकमत झालं असल्याची माहिती समोर आली आहे. दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर प्रभाग क्रमांक १९४ मनसेकडे जाणार असल्याचे महत्वाची माहिती समोर येत आहे.
दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ आणि १९४ मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी एकाच वेळी दावा केला होता. त्यानंतर यामधील एका प्रभागात ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार तर दुसऱ्या प्रभागात मनसेकडून उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेना १९२ मध्ये तर १९४ मध्ये मनसे लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर १६ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू युती करणार हे निश्चित झालं असून येत्या काहीच दिवसात त्याची घोषणा देखील केली जाणार आहे. युती जाहीर करण्याआधी काही जागांवरुन जो पेच सुरू आहे तो आजच सोडवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे.
शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. शिवडीतील २ जागा ठाकरेंच्या सेनेला, तर एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे. तर भांडूपच्या वॅार्ड क्रमांक ११४ वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पेच निर्माण झाला आहे तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सोडवला जात आहे.
हे देखील वाचा – Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून पहिली देशांतर्गत फ्लाइट; नाताळच्या दिवशीच होणार पहिले उड्डाण









