Congres manifesto – मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी काँग्रेसने केली असून, पारंपरिक मतदार असलेल्या उत्तर भारतीयांना साद घातली आहे. रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले, धोबीघाटातील धोबी यांच्याशी चर्चा करून काँग्रेसच्या उत्तर भारतीय संघटनेने वेगळा सात कलमी जाहीरनामा ( Congres manifesto) प्रकाशित केला आहे. मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरण राबवण्याची मागणी प्राधान्याने केली आहे.
मुंबई-ठाणे महापालिकांच्या निवडणुकीत मविआचा भाग असलेल्या उबाठाने मनसेशी युती करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसने उत्तर भारतीयांना विरोध करणार्या राज ठाकरे यांना विरोध म्हणून या युतीत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. आपले पारंपरिक मतदार असलेली मुंबईतील उत्तर भारतीयांची मते आपल्यापासून दुरावू नयेत म्हणून काँग्रेसने ही खेळी खेळली आहे.
मात्र, मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये भाजपाचाही प्रभाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर असलेल्या उत्तर भारतीयांना आकृष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या उत्तर भारतीय संघटनेने उत्तर भारतीय मतदारांसाठी खास वेगळा जाहीरनामा तयार केला आहे. यासाठी उत्तर भारतीय सेलच्या वतीने काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या सूचनेनुसार ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ ही मोहीम शहराच्या विविध भागांत राबवण्यात आली. या कालावधीत सेलच्या पथकांनी गायी-म्हशींचे गोठे, धोबी घाट, ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालक, फेरीवाले तसेच कामगार वस्तीच्या परिसरात जाऊन उत्तर भारतीय समाजाच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची नोंद घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्यात सात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. फेरीवाल्यांच्या सुरक्षिततेसाठी फेरीवाला धोरण लागू करावे, देशात कोणालाही कुठेही व्यवसाय करण्याचा, वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. या कायद्याचे पालन व्हावे, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी विश्राम केंद्रे सुरू करावी. सीएनजी भरण्यासाठीच्या केंद्रामध्ये वाढ करावी, सणासुदीला उत्तर प्रदेशात जाणार्यांसाठी स्थानकांवर थांबण्यासाठी विश्रांती केंद्र हवे, छठ पूजा सारख्या सणांना परवानगी नाकारू नये, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून इथे येणार्यांच्या निवासासाठी प्रवासी भवन हवे, गोठ्यांना (तबेल्यांना) परवाने द्यावेत यांचा समावेश आहे.
वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, उत्तर भारतीयांना वाद नको, तर विकास हवा आहे. पोटापाण्यासाठी व्यवसाय करणारे रिक्षावाले, फेरीवाले यांना मारहाण केली जाते. मात्र अर्धी मुंबई ज्यांना विकली त्या उद्योगपतींसाठी पायघड्या घातल्या जातात. भाषेच्या आणि प्रांताच्या नावावर होणारी वादावादीही थांबली पाहिजे.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
बांगलादेशात रक्तरंजित थराराचे सत्र सुरुच; बांगलादेशात शेख हसिना विरोधी नेत्यावर गोळीबार,









