Baramati election: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत एका अपक्ष उमेदवाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या निलेश इंगुले यांनी दणदणीत विजय मिळवत ‘दादां’ना थेट आव्हान दिले आहे.
दंड थोपटला आणि गुलाल उधळला
प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवणारे निलेश इंगुले हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र, ऐन निवडणुकीत तिकिट नाकारले गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. “अंगाला गुलाल लागणारच” अशी गर्जना करत त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे केले होते.
निकाल जाहीर झाल्यानंतर इंगुले यांनी 241 मतांच्या फरकाने विजय मिळवला. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले आणि मतदान केंद्राबाहेरच त्यांनी दंड थोपटून आपली ताकद दाखवून दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अजित पवारांच्या प्रभागातच मात
या निकालाचे विशेष महत्त्व म्हणजे, अजित पवार यांनी स्वतः प्रभाग क्रमांक 20 मध्ये लक्ष घालून आपल्या उमेदवारासाठी रणनीती आखली होती. बारामतीत “सगळ्या जागांवर घड्याळाची ‘टीकटीक ऐकू आली पाहिजे,” असा सज्जड दमही त्यांनी दिला होता. मात्र, निलेश इंगुले यांनी 2304 मते मिळवत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा (2063 मते) पराभव केला.
विजयानंतर बोलताना इंगुले म्हणाले, “बारामतीतील दादागिरी मोडून काढत जनतेने मला निवडून दिले आहे. मी लोकांसोबत आहे आणि जनता जे सांगेल तेच मी करेन.”
पवारांच्या बालेकिल्ल्यात इतरही पडझड
केवळ निलेश इंगुलेच नव्हे, तर इतर काही जागांवरही अजित पवार गटाला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. अपक्ष मनीषा बनकर यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांचा पराभव केला, तर रासपच्या वनिता अमोल सातकर यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याच्या मुलीला धूळ चारली.
बसपाच्या संघमित्रा चौधरी यांनीही ‘आमराई’ प्रभागातून विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 10 जागा जिंकून आपला दबदबा कायम ठेवला असला, तरी बारामतीतील या पराभवांमुळे पक्षांतर्गत नाराजी आणि जातीय समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.









