local bodies election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक (local bodies election) निकाल जाहीर झाल्यानंतरही महाराष्ट्रातील (Maharashtra) 57 स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य आता 21 जानेवारी रोजी येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. या 57 पैकी 39 ठिकाणी महायुतीने, 17 ठिकाणी मविआने, तर एका ठिकाणी अपक्षांनी विजय मिळवला आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते 21 जानेवारीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्थानिक सत्तासमीकरणे बदलू शकतो.
या 57 स्थानिक संस्था अशा 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींपैकी आहेत. जिथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठीची एकत्रित आरक्षणाची टक्केवारी 50% पेक्षा जास्त आहे. आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबर रोजी या 57 जागांवरील निवडणुका अंतिम आदेशाच्या अधीन राहतील, असे स्पष्ट केले होते. या निर्णयाचा परिणाम संबंधित नगरसेवक पदांच्या निकालांवरही होणार आहे.
निकाल जाहीर झाले असले तरी ते अंतिम आदेशावर अवलंबून असतील, असे राज्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. महायुतीला आपल्या 39 विजयांबाबत (भाजप : 30, शिवसेना: 5, राष्ट्रवादी काँग्रेस: 4) स्पष्टता मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मविआच्या 17 विजयांबाबतही (काँग्रेस: 11, शिवसेना यूबीटी: 2, राष्ट्रवादी काँग्रेस-एसपी: 4 )सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.









