pawar and thackeray : महाराष्ट्रात सत्तेसाठी वाटेल ते करू हे राजकारण आता अगदी उघडपणे मिरवले जात आहे. उद्धव आणि राज ठाकरे हे केवळ सत्तेसाठी संघर्ष करीत एकमेकांपासून दुरावले. अजित पवार यांनी तर सत्तेसाठी खंजीर खुपसत पहाटेच्या शपथविधीपर्यंत मजल गाठली. दोन्ही कुटुंबे पूर्ण दुरावली. दिवाळी स्वतंत्र आणि अगदी विवाह स्वतंत्र होऊ लागले. सुप्रिया सुळे भाच्याच्या लग्नात दिसल्या नाहीत, पण उद्योगपती जिंदालच्या मुलीच्या लग्नात नृत्य करताना दिसल्या. आता मात्र फडणवीस, शिंदे, अजित पवार या धबधब्याखाली आपण नष्ट होऊ हे लक्षात आल्यावर सत्तेसाठी ठाकरे व पवार एकत्र येणार आहेत. राजकारण किती रसातळाला गेले ते उद्या (ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद) आणि 26 डिसेंबरला (अजित पवार आणि शरद पवार युतीची घोषणा होणार) जनतेला दिसेल. ध्येय, धोरण, आचार, विचार हे सर्व मातीत पुरून काका-पुतण्या आणि दोघे भाऊ एकत्र येणार ( pawar and thackeray) आहेत..
पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
26 डिसेंबरला घोषणा होणार
पुणे महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika election )पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही पक्ष पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. 26 डिसेंबरला याची घोषणा होणार आहे. मात्र, या युतीला शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध करत राजीनामा दिल्याचे कळते आहे.
अजित पवार आज आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मी स्वतः 26 डिसेंबर रोजी युतीबाबत माहिती देणार आहे. तर अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये सामंजस्याने आणि एकमेकांच्या मदतीने निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली. यापुढची चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यांच्यासोबत होईल. जागावाटपाबाबत दोन्ही पक्ष दोन पावले मागे सरकण्यास तयार आहेत. एक-दोन दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. चिन्हासंदर्भात दोन्ही पक्षांनी कोणताही ताठरपणा न दाखवण्याचे ठरवले आहे.
मविआमध्ये अजित पवार गटाला सामील होण्याच्या शक्यतेवर बोलताना शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडला घेतलेल्या बैठकांत बर्याच पदाधिकार्यांचे आणि इच्छुकांचे म्हणणे होते की, आम्हाला अजित पवार गटासोबत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करणेगरजेचे आहे.
अजित पवार हे मागील तीन दिवस पुण्यात तळ ठोकून आहेत. शरद पवार गटातील नेत्यांशी त्यांच्या चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. पुणे महापालिकेतील 165 जागांपैकी कोण, किती जागांवर लढणार याबाबत बोलणी सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांच्या पक्षाकडून एक समन्वय समितीही स्थापन करण्यात आली असून, या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश आहे. यात प्रशांत जगताप यांचा समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळेच त्यांच्या नाराजीत भर पडल्याचे सांगितले जाते. त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे राजीनामा दिल्याचे सांगितले होते. परंतु आज सुप्रिया सुळे यांनी आपल्याकडे त्यांचा राजीनामा आलेलाच नाही, असे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, आमच्याकडे युतीचा तूर्तास कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे जे होईल ते प्रत्येकाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल.
प्रशांत जगताप म्हणाले की, अजित पवार यांच्याशी माझा वैयक्तिक वाद नाही. पण अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी असताना, त्यांच्यासोबत आघाडी कशी करायची? पुणेकरांना सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. महायुती सरकारमुळे पुण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अजित पवार त्या सरकारचा भाग असल्याने जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची? आपण हट्टाग्रही नसून विचारधारेशी निष्ठावान कार्यकर्ता आहोत. यावर सुभाष जगताप म्हणाले की, प्रशांत जगताप यांना अजित पवार यांनी पुणे बस मंडळावर घेतले, त्यांना मोठी पदे दिली, बैठकीत प्रशांत म्हणायचे की, माझी छाती फाडली तर त्यात अजित पवार दिसतील आणि आता ते अजित पवार यांच्याच विरोधात का गेले आहेत समजत नाही .
मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे म्हणाले की, सर्व महापालिकेत महायुती म्हणून आमची लढायची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहोत. अजित पवार स्वतः या चर्चेत सहभागी आहेत. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवडबाबत पूर्वी चर्चा झाली तेव्हा फडणवीस म्हटले होते की, आपण एकत्र लढल्यास सर्वांना सामावून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे विरोधकांना आपले उमेदवार आयतेच मिळू शकतात. त्यामुळे आपण विरोधकांना रोखण्यासाठी वेगळे लढू. दादांनीही त्याला दुजोरा दिला होता. आता इतर पक्षाशी युती करण्यास आम्ही मोकळे आहोत. शरद पवार गटाशी युतीबाबत अजित पवारच बोलतील.
मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नवाब मलिक यांना भाजपाने विरोध केला आहे. त्याबाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, मी आशिष शेलार यांच्याशी बोललो आहे आणि उद्या अजित पवार हे मुंबईत येत असून, त्यानंतर पुन्हा शेलार यांच्याशी चर्चा करून मुंबई महापालिकेबाबत निर्णय होईल.
अखेर मुहूर्त ठरला! आज
उबाठा-मनसे युतीची घोषणा
उबाठाचे नेते संजय राऊत यांनी आज दुपारी एक्स या सोशल मीडियावर ‘उद्या 12 वाजता’ अशी केवळ तीन शब्दांची पोस्ट केली. या पोस्टसोबत त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो टाकला. त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबांच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतो. त्यामुळे ही पोस्ट अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या उबाठा-मनसे युतीच्या घोषणेसंदर्भातच आहे, हे स्पष्ट झाले. युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी 12 वाजता वरळीच्या ब्लू सी हॉलमध्ये करण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. ही युती केवळ मुंबईपुरतीच मर्यादित नसून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, मुंबई, नाशिक शहरांतही उबाठा-मनसे एकत्र लढणार आहे.
त्याआधी दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्यात आले. माहीम, शिवडी आणि भांडूप या मराठीबहुल भागांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, असा मनसेचा आग्रह होता. त्यावरही तोडगा काढण्यात आला. मनसेने माहीममध्ये प्रभाग क्र. 190 (भाजपाच्या शीतल गंभीर माजी नगरसेवक) व 194 (शिंदे गटाचे समाधान सरवणकर माजी नगरसेवक) यांवर दावा केला आहे. तर मनसेला प्रभाग क्र.192 (उबाठाच्या प्रिती पाटणकर माजी नगरसेवक) पाहिजे होता. आज भांडूपचे मनसेचे इच्छुक उमेदवार आणि यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे आदींनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची गर्दी असल्याने संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे. तोपर्यंत जागावाटपाबाबत गुप्तता ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे उबाठा 150, मनसे 50 ते 65 व शरद पवार 15 ते 20 जागा लढवतील, अशी योजना आहे.
दुसरीकडे आपापल्या पक्षातील इच्छुक, नाराज व जास्तीत जास्त जागांचा आग्रह धरणारे कार्यकर्ते यांची समजूत काढण्याचे प्रयत्न आज दोन्ही पक्षांकडून सुरू होते. मनसेच्या अनिशा माजगावकर या राज ठाकरेंच्या निवासस्थान शिवतीर्थावर पोहोचल्या. भांडूपमध्ये तीन प्रभाग मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. त्यांची यशवंत किल्लेदार व संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्याशी भेट झाली. पक्षातील नाराजीबाबत विचारले असता मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. त्यात जागा हा विषय नाही. पण चर्चा होत असते, त्यात नाराजी वगैरे काही नाही. ना इकडे, ना तिकडेही. मुंबईसाठी बलिदान द्यायला सगळेजण तयार आहेत.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
तुर्कीची विमाने वापरण्यास इंडिगोला मार्चपर्यंतच मुदत
मुंबईत भगवे धगधगले; बांगलादेशातील अत्याचारावर मुंबईत तणावाचा स्फोट









