CDS General Anil Chauhan : भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख म्हणजेच सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबईतील ‘आयआयटी बॉम्बे’ येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारताने आता कमी कालावधीच्या तीव्र संघर्षासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धांसाठीही सज्ज राहिले पाहिजे.
शेजारील देशांसोबत असलेले सीमावाद आणि दहशतवादाचे सावट पाहता भारतीय लष्कराला आपली रणनीती अधिक व्यापक करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेजारील देशांचे आव्हान
जनरल चौहान यांनी थेट चीन किंवा पाकिस्तानचे नाव घेतले नाही, तरी भारताच्या दोन्ही शेजाऱ्यांकडे अण्वस्त्रे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आपले दोन्ही प्रतिस्पर्धी अण्वस्त्र सज्ज आहेत, त्यामुळे आपली संरक्षण क्षमता अशा स्तरावर असावी की कोणीही आपल्या सीमा ओलांडण्याचे धाडस करणार नाही,” असे ते म्हणाले.
सीमावादांमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य दलांची तयारी ही दोन प्रमुख तथ्यांवर आधारित असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मल्टी-डोमेन ऑपरेशन्स’ची गरज
भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलणार असल्याचे सांगताना जनरल चौहान यांनी ‘मल्टी-डोमेन ऑपरेशन्स’वर भर दिला. आता युद्ध केवळ जमीन, पाणी किंवा आकाशापुरते मर्यादित राहिलेले नाही. भविष्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलासोबतच सायबर सुरक्षा, अंतराळ क्षेत्र आणि मानवी विचारप्रक्रियेवर प्रभाव टाकणाऱ्या क्षेत्रांमध्येही समन्वय असणे अनिवार्य आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा दाखला देत त्यांनी सांगितले की, केवळ 4 दिवस चाललेल्या या युद्धात भारताने सर्वच क्षेत्रांत एकाच वेळी जोरदार प्रहार केल्यामुळे निर्णायक विजय मिळवला होता.
तंत्रज्ञान आणि लष्करी ताळमेळ
येणाऱ्या काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून सायबर आणि स्पेस फोर्सची भूमिका कळीची ठरणार आहे. तिन्ही सैन्य दलांमध्ये केवळ समन्वय असून चालणार नाही, तर त्यांचे नियंत्रण आणि परिचालन एकात्मिक पद्धतीने होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. भारताच्या अखंडतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी संरक्षण दलांना आधुनिक आव्हानांनुसार स्वतःला बदलावे लागेल, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.









