Income Tax Advisory SMS : अनेक करदात्यांना सध्या प्राप्तिकर विभागाकडून एसएमएस किंवा ईमेल प्राप्त होत आहेत. हे मेसेज मिळाल्यानंतर करदात्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) यावर स्पष्टीकरण दिले असून करदात्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
हे मेसेज केवळ सल्ल्याच्या स्वरूपात असून तुमच्या व्यवहारांची माहिती आणि तुम्ही भरलेला टॅक्स यात तफावत आढळल्यास तुम्हाला सावध करण्यासाठी पाठवले जात आहेत.
नेमका मेसेज काय आहे?
प्राप्तिकर विभागाच्या विश्लेषणानुसार, अनेक करदात्यांनी विवरणपत्र भरताना अशा सवलतींचा किंवा वजावटींचा दावा केला आहे, ज्यासाठी ते पात्र नाहीत. तुमच्या वार्षिक माहिती विवरणात (AIS) असलेल्या आर्थिक व्यवहारांची नोंद आणि तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमधील माहिती यात मोठी तफावत दिसून आल्यास विभाग असे मेसेज पाठवत आहे. याचा मुख्य उद्देश करदात्यांना त्यांच्याकडून झालेली चूक स्वतःहून सुधारण्याची संधी देणे हा आहे.
३१ डिसेंबरपूर्वी करा ‘हे’ काम
आयटी विभागाने स्पष्ट केले आहे की, जर तुम्हाला असा मेसेज मिळाला असेल तर तुम्ही तुमच्या ‘एआयएस’ची पुन्हा एकदा तपासणी करावी. जर काही चूक झाली असेल, तर तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या कंप्लायन्स पोर्टलवर जाऊन ऑनलाईन फीडबॅक देऊ शकता.
तसेच, गरज असल्यास तुम्ही तुमचे आधीच भरलेले विवरणपत्र सुधारून (Revised Return) पुन्हा सादर करू शकता. ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, ते विलंबित विवरणपत्र (Belated Return) देखील भरू शकतात.
महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सुधारित किंवा विलंबित विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर तुमच्या माहितीमध्ये कोणतीही तफावत नसेल आणि तुम्ही सर्व माहिती अचूक भरली असेल, तर तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करू शकता.
मात्र, काही चूक असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे आता केवळ काही दिवसांचा अवधी उरला आहे. वेळेत कार्यवाही न केल्यास भविष्यात विभागाकडून कायदेशीर नोटीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा – BMC Election : मुंबई महापालिकेत काँग्रेस-‘वंचित’ची हातमिळवणी? प्रकाश आंबेडकरांचा 50-50 चा फॉर्म्युला; काँग्रेस पेचात









